दलित पँथरच्या ठरावाची अंमलबजावणी करा नसता राज्यात तीव्र आंदोलनाचा इशारा

 0
दलित पँथरच्या ठरावाची अंमलबजावणी करा नसता राज्यात तीव्र आंदोलनाचा इशारा

भारतीय दलित पॅंथरच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात 26 ठराव पारित 

ठरावाची अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - जन सुरक्षा विधेयक रद्द करावे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाडापाडी केलेल्या गोरगरिबांची घरे बांधून देण्यात यावी या व इतर मागण्यां सह 26 ठराव भारतीय दलित पॅंथरच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात मंजूर करण्यात आले . राज्य व केंद्र सरकारने ठराव याची अंमलबजावणी न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पॅंथर नेत्यांनी या मेळाव्यात दिला भारतीय दलित पॅंथरच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे उत्साहात पार पडला त्यात हे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात साहित्यिक व समीक्षक प्राध्यापक डॉ. ऋषिकेश कांबळे भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर, मार्गदर्शक प्रा. प्रकाशराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, ॲड. सिद्धार्थ गवई, सुप्रिय बनसोडे, जालन्याचे एजाज खान, सत्तार पटेल, परभणीचे गौतम इंगोले, जिंतूरचे तालुका अध्यक्ष खंडेराव साळवे, वैजापूरचे तालुकाध्यक्ष देविदास जाधव, सिल्लोडचे तालुका अध्यक्ष संजय सरोदे, वकील आघाडीचे कैलास पवार, वसंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले भारतीय दलित पॅंथरने अनेक सामाजिक लढे लढले नामांतराचा प्रश्न गायरान जमिनी हक्क बेरोजगारी यावर सातत्याने आवाज उठवला. कालांतराने पँथरचे शकले उडाल्यानंतर जातीयवादी संघटनांनी डोके वर काढले लक्ष्मण भुतकर यांनी 1999 ला पॅंथर स्थापन करून दलित दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रहार केले. यापुढे आपल्याला आणखी संघटित होऊन आणखी नेटाने संघटना पुढे न्यावी लागणार आहे. नामांतरानंतर पुन्हा एकदा आपल्या अस्मिता आणि अस्तित्वासमोर आव्हान उभे राहिले आहे. आपल्या अस्तित्वाचा व अस्मितेचा लढा नव्याने उभारावा लागेल. पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर म्हणाले पॅंथरने कोणकोणते सामाजिक लढे उभारले हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. 1972 ला पॅंथर स्थापन झाल्यानंतर प्रस्थापित नेत्यांनी पॅंथर फोडली 1999 ला पुन्हा पॅंथर स्थापन करून सामाजिक लढे उभारण्याचे काम सातत्याने केले. काही मूठभर लोक सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले पैसे घेऊन मोर्चे काढण्याची जमात आता निर्माण झाली आहे. शहरांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महापालिकेने गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर फिरवले त्याच वेळी हे तथाकथित दलित नेते मूग गिळून गप्प बसले. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यानंतरच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन पँथरच्या शाखा स्थापन कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. प्रकाशराव सोनवणे म्हणाले भारतीय दलित पॅंथर लढाऊ संघटनेने अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम केले. विद्यापीठ नामांतर आंदोलनामध्ये अनेक पॅंथर शहीद झाले परंतु आता आपण संघटित नसल्यामुळे कोणावर धाक राहिला नाही. गायरान जमिनीचे प्रश्न दलितांसाठी शिक्षण नोकऱ्या याकडे जातीयवादी पक्षांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला संघटित होऊन जातीवादी पक्ष सोबत लढावे लागणार आहे. यावेळी प्रा.सोनवणे यांनी 26 ठरावाचे वाचन केले त्यावेळी सभागृहातील उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव मंजूर केले. केंद्र राज्य सरकारने ठरावाकडे डोळे झाक केले तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी पँथर नेत्यांनी दिला. या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीम गायिका कडूबाई खरात आणि कुणाल वराळे, सरलाताई तायडे यांचाही सन्मान करण्यात आला. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, दशरथ कांबळे, समाधान कस्तुरे, गौतम सोनवणे, राजानंद नवतुरे, ॲड. सतीश राऊत, युवा नेते अमोल भुतकर, सुमित्राबाई कासारे, पार्वतीबाई घोरपडे, गीताबाई मस्के, दैवशाली झीने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow