दिशा समिती बैठकीचा मुहुर्त ठरला, केंद्रीय योजनांवर नियंत्रण कोणाचे- इम्तियाज जलिल

 0
दिशा समिती बैठकीचा मुहुर्त ठरला, केंद्रीय योजनांवर नियंत्रण कोणाचे- इम्तियाज जलिल

अखेर ! दिशा समिती बैठकीचा मुहुर्त ठरला; केंद्रीय योजनांवर नियंत्रण कोणाचे ? – खासदार इम्तियाज जलील

दोन केंद्रीय मंत्री असतांना सुध्दा सर्वसामान्य जनता योजनांपासून कोसोदुर

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) सर्वसामान्य नागरीकांसाठी असलेल्या केंद्रीय पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी याकरिता जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची किमान दर तीन महिण्याला आढावा बैठक घेणे बंधनकारक असतांना सुध्दा वर्षातुन एकदाच बैठक होत आहे. विशेष म्हणजे शहरात दोन केंद्रीय मंत्री असतांना व अनेक योजना हे थेट प्रधानमंत्री यांच्या नावानेच असतांना सुध्दा केंद्रीय योजनांची बैठक होत नाही आणि सर्वसामान्य जनता योजनांपासून वंचित राहते हे दुर्देव असल्याचे खासदार इम्तियाज यांनी सांगितले.

          अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर दिशा समितीची बैठक मागील वर्षी २० ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली होती. त्यानंतर थेट दहा महिण्यांनंतर म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय पुरस्कृत योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना कधी मिळणार ? योजनांची सद्यस्थिती कोणालाच माहिती नाही ? योजनांची अमलबजावणी करणार्‍या यंत्रणावर प्रशासनाचे वर्चस्वच राहिले नाही असे अनेक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी दिशा समितीच्या होणार्‍या बैठकीवर लावले.  

          मागील वर्षी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न, मुद्दे, समस्या व तक्रारी उपस्थित केल्या होत्या. त्यांचे आजपर्यंत निराकरण झालेचं नाही. विशेष म्हणजे बैठकीत आश्वासन देणारे विविध विभागाशी संबंधित अधिकार्‍यांची बदली झालेली आहे. मग तेच प्रश्न, मुद्दे पुन्हा उपस्थित करावे लागणार मग जनतेला योजनांचा लाभ कधी मिळणार ? केंद्रीय योजना ही फक्त आश्वासनच असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावला  

          शहरी व ग्रामीण भागाचे सर्वांगिण विकास करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरीकांचे राहणीमान सुधारणे, आरोग्य, शैक्षणिक, रोजगार संबंधी तसेच सर्व सामान्य नागरीकांना व शेतकरी बांधवांना मुलभुत सोयीसुविधा मिळावे याकरिता केंद्र शासनाच्या वतीने विविध क्षेत्राशी संलग्नित महत्वपूर्ण योजना दिशा कमिटीच्या अंतर्गत राबविले जातात. ज्यामध्ये स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री उज्वला योजना, एलपीजी कनेक्शन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, जल जीवन मिशन कार्यक्रम, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, सर्व शिक्ष योजना, मिड डे मील योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन – राष्ट्रीय रुरबन मिशन, रोजगार हमी योजना व इतर महत्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.

          जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेत दिनांक २१ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी, सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow