प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक, रुग्णवाहिकांना जीपीएस बसवणे अनिवार्य...

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक...
रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य; 1 डिसेंबरपासून होणार कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- रुग्णवाहिका म्हणून नोंद असणाऱ्या वाहनांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य आहे. येत्या 1 डिसेंबर पर्यंत रुग्णवाहिकाधारकांनी आपल्या वाहनांवर ‘जीपीएस’ स्वखर्चाने बसवून घ्यावे व त्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडे द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आज झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकीत देण्यात आले.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अपर आयुक्त रणजीत पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, पोलीस उपायुक्त भुजंग आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिकांव्यतिरिक्त अनेक संस्था, धर्मादाय रुग्णालये व खाजगी सेवाभावी व्यक्ति रुग्णवाहिका सेवा देत असतात. मात्र या रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बसविणे आवश्यक आहे. जेणेकरुन प्रत्येक रुग्णवाहिकेचा संचार नियमन करता येईल. त्यामुळे सर्व रुग्णवाहिकांना संबंधितांनी स्वखर्चाने जीपीएस प्रणाली बसवून त्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे द्यावी. त्यासाठी 1 डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रुग्णवाहिकांची संबंधित यंत्रणांमार्फत तपासणी करुन पहिल्यावेळेस 10 हजार रुपये दंड, दुसऱ्यावेळी 20 हजार रुपये दंड व तिसऱ्या वेळी वाहन जप्त करुन नोंदणी निलंबन केले जाईल.
अनेक खाजगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका ह्या त्यांच्या रुग्णालयांव्यतिरिक्त इतरांना सेवा देत नाहीत, ही बाब गंभीर असून रुग्णवाहिकेचा मुळ उद्देश यामुळे साध्य होत नाही. तथापि, जीपीएस बसविलेल्या रुग्णवाहिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या स्मार्टसिटी मार्फत जनतेपर्यंत पोहोचविली जाईल जेणेकरुन अधिकाधिक लोक ऐनवेळीच्या मदतीसाठी रुग्णवाहिकाचालकांना संपर्क करु शकतील.
तसेच आजच्या बैठकीत ई- रिक्षांचे प्रवासी भाडेदर निश्चित करण्यात आले. सर्व ई रिक्षांना मिटर बसविणे अनिवार्य असून ते त्यांनी बसवून घ्यावे. विना इंडिकेटर रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. महिला प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. जे रिक्षामालक आपली रिक्षा अन्य रिक्षाचालकांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देतात त्यांनी संबंधित चालकाचा परवाना, बक्कल , आधार कार्ड, पत्त्याचे पुरावे, मोबाईल क्रमांक प्रादेशिक परिवहन कार्यालयात व नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करावा. बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले. बेकायदा वाळू वाहतुक केल्याचे निदर्शनास 30 दिवसांसाठी वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात यावी,असेही संबंधितांना निर्देश देण्यात आले.
What's Your Reaction?






