बागेश्वर बाबांचा शहरात नोव्हेंबर मध्ये तीन दिवस दरबार भरणार, लाखो भक्त येणार

सनातन संस्कृती नष्ट करणे अशक्य - प.पू.रामगिरी शास्त्री महाराज
संत महंतांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयाचे उदघाटन
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) धर्म जागृती ही अत्यंत महत्वाची आहे, त्यात हिंदू समाज म्हणजे कुंभकर्णापेक्षा अधिक झोपणारा समाज आहे. यामुळे काही शक्ती या हिंदूच्या सनातन संस्कृतीवर आघात करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सनातन म्हणजे कधीही नष्ट न होणारा असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ही संस्कृती नष्ट करणे अशक्य असल्याचे मत सरला बेटचे मठाधिपती प.पू.रामगिरी शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले. शहरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान बागेश्वर बाबा यांचा दरबार होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्शवभूमीवर, रविवारी आकाशवाणी परिसरातील निशा बाफना प्लाझा कॉम्प्लेक्स येथे स्वतंत्र संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले, या कार्यालयाच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्रीक्षेत्र मन्मतधाम संस्थान कपिलधार मांजरसुंबाचे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य स्वामी महाराज, वारकरी संप्रदायचे नवनाथ महाराज आंधळे, इस्कॉनचे रुक्मिणी प्रभुदास, प्रेम प्रभुदास, आनंदशास्त्रीगिरी महाराज, महानुभाव आश्रमच्या तपस्विनी रोहिनी शास्त्री कपाटे, उदासी मठचे अनिलदास महाराज, कबीरमठचे महंत १००८ शांतीदास सुखदेव शास्त्री महाराज, श्रीकृष्ण विराटरूप मंदिराचे प्रभाकर महाराज हरळ, व्दारकाधिश आश्रमचे महामंडलेश्वर विशालानंद सरस्वती, गोविंद गोशाळा मौसाळाचे भागवताचार्य विजय पल्लोड महाराज, चिन्मय मिशनचे आत्मेशानंदजी श्रवणचैतन्य महाराज, खडकसिंग ग्रंथी, रांजनगाव वाळुजचे हभप रामेश्वर महाराज, शनिसाधीका डॉ.विभाश्री दिदी, विनायक महाराज अष्टेकर, अर्जुन महाराज पांचाळ, एकनाथ महाराज वाघ, माधव महाराज पित्तरवाड, वज्रखेड संस्थान जुना आखाडाचे देवानंदगिरी महाराज आदी संत महंतांसह केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट , भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे, भाजपच्या अनुराधा चव्हाण, श्री माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष जगदीश बियाणी, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत अध्यक्ष संजयआप्पा बारगजे, विहिंप मंदिर अर्चक पुरोहित आयाम, देवगिरी प्रांत प्रमुख राजीव जहािगरदार, अखिल मारवाडी संमेलनचे संघटन मंत्री वीरेंद्र धोका, सकल मारवाडी महासभेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना रामगिरी शास्त्री महाराज यांनी सनातन संस्कृती कशी महान आहे आणि ती जगात का पुजनिय आहे हे भारत -चीन युध्दप्रसंगीचे तसेच महाभारत युध्दातील र्दौपदीचे उदाहरण देत स्पष्ट केले. यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेला साडेतीनशे वर्ष होत असल्याची आठवण करून दिली. शिवराय नसते तर या व्यासपीठावर आज रामगिरी महाराज नसते असा शब्दात त्यांनी शिवरायांच्या कार्याची महती विशद केली. यामुळेच आजची परिस्थिती पाहता हिंदू समाजाला संघटीत करण्यासाठी असे कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी माजी नगरसेवक दिलीप थोरात, हर्षवर्धन कराड, शिवाजी दांडगे, कचरू घोडके, जगदीश सिध्द, राजु शिंदे, भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे जालिंदर शेंडगे, भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष लक्षमण शिंदे आदींसह सकल हिंदू समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतांच्या आशिवार्दामुळेच मंत्री - डॉ. कराड
धर्म आणि संस्कृती टिकण्याचे श्रेय हे संत महंतांचेच आहेत. त्यामुळेच आपण त्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन केले. मी आणि आमदार संजय शिरसाट यांनी महापालिकेत सोबतच सुरूवात केली. परंतु ते पुढे गेले अन् मी मागेच राहीलाे याची खंत वाटत होती. परंतु अचानक दिल्लीचा फोन आला आणि मी खासदार, मंत्री झालो. हे देखील केवळ संतांच्या आशिवार्दामुळेच शक्य झाल्याचे मंत्री डॉ. कराड यावेळी म्हणाले. सकल हिंदू समाजाच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दिव्य दरबारात भक्त होतात तल्लीन - मंत्री सावे
आमदार शिरासाट म्हणाले, व्यासपीठावरील नावे घेऊ नका परंतु आजचा कार्यक्रम माझ्या मतदार संघातील असल्याने ती घ्यावीच लागतील. बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराचा मी देखील दोनदा अनुभव घेतला आहे. एकवेळा मला त्यांच्या अमृतवाणीतून राम तर दुसऱ्या वेळेस हनूमान कथा एेकण्याचे भाग्य लाभले. त्यांची पर्चा काढण्याची पध्दत तर अनोखी आहे. त्यांच्या दिव्य दरबारात गेल्यानंतर भक्त तहान, भूक विसरून अक्षरश: तल्लीन होऊन जातात असा अनुभव मंत्री सावे यांनी सांगितला.
मतदार संघ माझाच, मीच स्वागताला येणार - आ. शिरसाट
सत्तेत गेल्यानंतरचे परिणाम मंत्री डॉ.कराड यांना आता कळाले आहेत. असो बागेश्वर बाबांचा कार्यक्रम हा माझ्याच मतदार संघात होत आहे. त्यामुळे मीच बागेश्वर बाबांच्या स्वागताला राहणार आहे. त्यांच्या दरबारात अनेक जण आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन येतात. असे दहा लाख लोक आले तर तीस लाख प्रश्न येतील. त्यामुळे हिंदूना सतावणाऱ्यांचा बंदोबस्त कसा होणार ? हे सांगा असा प्रश्न दरबारात यायला हवा असे म्हणत, आमदार शिरसाट यांनी भगव्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहनही केले.
What's Your Reaction?






