महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामांचे होणार सर्वेक्षण
 
                                महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण
- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षण
विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.21(डि-24 न्यूज) प्रदेश विकास महानगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विना परवानगी भूखंड तसेच बांधकाम सर्वेक्षणाबाबत श्री. गावडे यांनी आज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वेक्षणासाठी सेवा देणारे विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, सह महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महानगर आयुक्त श्री.गावडे म्हणाले, औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत ,विना परवाना भूखंड व बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वेक्षणासाठी आपली सेवा देणार आहेत. "कमवा व शिका" योजनेच्या धर्तीवर शैक्षणिक अभ्यासक्रमावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. या सर्वेक्षणा अंतर्गत महानगर क्षेत्रात नागरिकांकडे विद्यार्थी जातील त्यावेळी नागरिकांनी आपल्याकडील या संदर्भातील कागदपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वेक्षणातील प्रश्नावली बाबत अचूक माहिती द्यावी. जेणेकरून नियमाप्रमाणे भूखंड तसेच बांधकाम नियमित करण्याकामी मदत होणार आहे.
अनधिकृत भूखंड तसेच बांधकाम नियमित झाले तर गरजूंना या मालमत्तेवर बॅंकेकडून कर्ज मिळणेही सुलभ होणार आहे. तसेच ज्यांना सदर मालमत्तेची विक्री करावयाची असल्यास विक्री करणेही सुलभ होईल. त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षण मोहिमेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त श्री गावडे यांनी केले.
सर्वेक्षणाअंतर्गत विद्यमान वापर, भूखंड धारकांचे नाव, भूखंड क्रमांक, गट क्रमांक, मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवानगी, सातबारा उतारा, भूमी अभिलेख
कार्यालयाकडील मोजणी, ग्रामपंचायत 8 अ उतारा, वीज देयक ,लेआऊट प्रत, भूखंडाचे क्षेत्रफळ, बांधकामाचे क्षेत्रफळ, भूखंड तसेच बांधकामाचा कच्चा नकाशा मिळकतीचे वर्णन याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            