महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, बोनस जाहीर, कोणाला किती वाचा बातमी
मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 5 हजारांचे सानुग्रह अनुदान
बालवाडी शिक्षिका व अन्य कर्मचाऱ्यांना 3,500 रुपयांची दिवाळी भेट... दिव्यांग बांधवांना चार महिन्यांचा भत्ता...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दिवाळीची भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा वर्ग 4 कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान, तर बालवाडी शिक्षिका व अन्य पात्र कर्मचाऱ्यांना 3 हजार 500 रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांग बांधवांना चार महिन्यांचा दिव्यांग भत्ता अदा करण्यात येणार आहे.
आज झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान व दिवाळी भेटीबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेवर सकारात्मक निर्णय घेत महापौर समीर राजुरकर यांनी या घोषणा केल्या.
यापूर्वी वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 3 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत होते. यामध्ये वाढ करून आता सरसकट 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच दैनिक वेतनावरील वर्ग 3 व 4 कर्मचारी, शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका, तासिका तत्त्वावरील माध्यमिक शिक्षक, आरोग्य विभागातील लिंक वर्कर सुपरवायझर आणि बचत गटातील सफाई मजुरांना दिवाळी भेट म्हणून 3 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 2 हजार रुपये होती.
दिवाळीनिमित्त 6 कोटी 30 लाखांहून अधिक रकमेचे वितरण
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार दिवाळी सणानिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये अग्रिम स्वरूपात देण्यात येणार आहेत. महानगरपालिका व शिक्षण विभागातील एकूण 998 कर्मचाऱ्यांना यासाठी 1 कोटी 24 लाख 75 हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत.
वर्ग 4 मधील एकूण 2 हजार 452 कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी 1 कोटी 22 लाख 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच पात्र दैनिक वेतनावरील कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, तासिका तत्त्वावरील शिक्षक, लिंक वर्कर सुपरवायझर आणि सफाई मजुरांना प्रत्येकी 3 हजार 500 रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.यात महानगरपालिका 11,शिक्षण विभाग 106 ,आरोग्य विभाग लिंक वर्कर 04 व बचत गट सफाई मजूर 352 लाभार्थी यांचा समावेश आहे.असे एकूण मिळून 16 लाख 55 हजार पाचशे रुपये अदा करण्यात येणार आहे.
दिव्यांग बांधवांना चार महिन्यांचा भत्ता...
दिव्यांग विकास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने एकूण 4 हजार 589 दिव्यांग लाभार्थ्यांना चार महिन्यांचा दिव्यांग भत्ता देण्यात येणार आहे. यासाठी 3 कोटी 66 लाख 81 हजार 500 रुपये अदा करण्यात येणार आहेत.
अशा प्रकारे दिवाळी सणानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने एकूण 6 कोटी 30 लाख 72 हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मनपा कर्मचाऱ्यांसह दिव्यांग लाभार्थ्यांची दिवाळी अधिक आनंददायी होणार आहे.
महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी संजय कोलते या निधी वितरणाचे नियोजन करीत आहेत.
What's Your Reaction?