शहरात ट्रॅव्हल - टुरिझम गाईड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्याची डाॅ.भागवत कराड यांची मागणी...
शहरात ‘ट्रॅव्हल–टुरिझम गाईड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’ सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवतजी कराड यांची राज्यसभेत जोरदार मांडणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अग्रस्थानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ट्रॅव्हल–टुरिझम गाईड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्याची मागणी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवतजी कराड यांनी राज्यसभेत केली. जिल्ह्यातील वाढती पर्यटनस्थळांची लोकप्रियता, मोठी पर्यटक संख्या आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांची कमतरता लक्षात घेऊन ही मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभा दरम्यान बोलताना डॉ. कराड म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्र पर्यटनाची राजधानी मानले जाते. जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, कैलास मंदिर, देवगिरी (दौलताबाद) किल्ला, बीबी का मकबरा, पानचक्की यांसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांमुळे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या भागात येतात. या पर्यटकांना योग्य, ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि सांस्कृतिक माहिती देण्यासाठी प्रशिक्षित आणि प्रमाणित पर्यटन मार्गदर्शकांची मोठी गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर, डॉ. कराड यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट (IITTM) सारखीच केंद्रीय सरकारी संस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन करण्याची मागणी सरकारसमोर मांडली.
अशी संस्था स्थापन झाल्यास—आधुनिक पर्यटन शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होईल, व्यावसायिक व उच्च दर्जाचे मार्गदर्शक स्थानिक पातळीवर तयार होतील,पर्यटन क्षेत्राची गुणवत्ता आणि प्रतिमा अधिक उंचावेल, स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होतील,
आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकासाला नवे आयाम मिळतील असेही त्यांनी सांगितले. डॉ. कराड यांनी या संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी ठाम मागणी राज्यसभेतून नोंदवली.
What's Your Reaction?