शहरात वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरण खंडपिठ तयार करण्याची मागणी
 
                                संभाजीनगरात वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरण खंडपीठ तयार करा...
विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांची मागणी...
संभाजीनगर(औरंगाबाद),दि.14(डि-24 न्यूज) संभाजीनगर शहर हे मराठवाडा विभागाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच औद्यौगिक, पर्यटन, व्यावसायाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठिकाण असल्यामुळे येथे वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरणाचे (GSTAT) खंडपीठ (Circuit Bench) छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने व्यवस्थापित करुन कार्यान्वित करण्याबाबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
देशातील विविध राज्यांनी जीएसटी कौन्सिलकडे पाठवलेल्या प्रस्तावात ५० न्यायाधिकरण खंडपीठांची स्थापना करण्याची सूचना केली होती. तद्नुषंगाने केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) साठी राज्य खंडपीठांची स्थापना करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे. वस्तू व सेवा कराच्या (GSTAT) राज्य खंडपीठांमुळे करदाते आणि पुरवठादारांना जलदगतीने न्याय मिळणार असून सर्व माननीय उच्च न्यायालयांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याकडे दानवे यांनी पत्रातून सरकारचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अपीलांवर देखरेख करण्यासाठी तीन खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहेत. उक्त खंडपीठांसाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या शहरांची निवड करण्यात आली असल्याने उक्त खंडपिठाचे (Circuit Bench) स्थान निश्चित करण्याचे काम पुरवठादारांकडून प्राप्त अपिलांच्या अनुषंगाने महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या आदेशानुसार व्यवस्थापित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले असल्याचा उल्लेख अंबादास दानवे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मध्यवर्ती ठिकाण असून सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. तसेच मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात करदाते व पुरवठादार आहेत. त्यानुसार वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरणाचे (GSTAT) खंडपीठ (Circuit Bench) छत्रपती संभाजीनगर येथे व्यवस्थापित केल्यास मराठवाड्यातील सर्व करदात्यांना न्याय मिळेल आणि व्यवसाय सुरळीतपणे चालवता येईल व मराठवाड्यातील व्यापार वाढण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा दानवे यांनी पत्रातून व्यक्त केली.
त्यामुळे यात व्यक्तीशः लक्ष घालून वस्तू व सेवा कराचे अपिलीय न्यायाधिकरणाचे (GSTAT) खंडपीठ (Circuit Bench) छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने व्यवस्थापित करुन कार्यान्वित करण्याबाबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            