शहरात 18 लाखांची कोडीनयुक्त सिरप फिल्मी स्टाईलने पोलिसांनी पकडली, अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई...तीन आरोपी अटक...
गुन्हे शाखेची मोठी कारवाई : कोडीनयुक्त सिरप विक्रीसाठी आणलेल्या तिघांना अटक, 18.78 लाखांचा मुद्देमाल जप्त, फिल्मी स्टाईलने पोलिसांनी गाडीचा पिछा करत काच फुटलेली गाडी रात्री पकडली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -
छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या बाटल्या (कोडीनयुक्त सिरप) विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा इसमांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत 18 लाख 78 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.30 वाजता पंचायत समिती कार्यालयाजवळ करण्यात आली.
पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. रवींद्र नवले व सहायक पोलीस आयुक्त श्री. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवली होती. गुप्त माहितीच्या आधारे संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये CODYN SF सिरपचे 26 बॉक्स आढळून आले.
प्रत्येक बॉक्समध्ये Triprolidine Hydrochloride & Codeine Phosphate Syrup चे 100 मि.ली. क्षमतेचे सीलबंद बाटल्या होत्या. एकूण 3120 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची बाजार किंमत सुमारे 12 लाख 48 हजार 800 रुपये आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी :
शेख समीर राजासाहेब, वय 24, रा. आनंदनगर, लातूर
सय्यद अल्ताफ बाबू, वय 23, रा. बालाजीची वाडी, उदगीर, जि. लातूर
उमर अब्दुल साहेब शेख, वय 36, रा. बुद्धनगर, लातूर
तपासादरम्यान आरोपींकडून 03 मोबाईल फोन (₹30,000) तसेच शेवरलेट कंपनीची कार क्रमांक MH-12-HN-9917 (₹6,00,000) जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹18,78,800 इतकी आहे.
तपासात आरोपींनी सदर सिरप लातूर येथील मराठवाडा मेडिकल येथून खरेदी करून ते छत्रपती संभाजीनगर शहरातील शाहबाजार, चंपाचौक परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात औषध विक्रेता अशपाक पटेल (शाहबाजार) व मराठवाडा मेडिकल, लातूरचे मालक/चालक यांना आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणी NDPS Act 1985 तसेच औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरील कार्यवाही गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, पोउनि प्रविण वाघ, जगन्नाथ मेंदकुदळे, दिनेश बन, पोह योगेश नवगारे, विजय निकम, प्रकाश गायकवाड, नवाब शेख, पोअं गणेश सागरे, राजेश यदमळ, सागर पांढरे, राजाराम डाखुरे, दिपक शिंदे, प्रमोद सुरसे, प्रतिक साबळे, अभिषेक राऊत, मपोअं माया माळी, पुजा इंगळे, पोचा दादाराव झारगड यांनी केली आहे.
पोलीस आवाहन
छत्रपती संभाजीनगर शहरात कोठेही अवैध अमली पदार्थ किंवा नशेची औषधे विक्री होत असल्याची माहिती असल्यास संबंधित पोलीस स्टेशन, डायल 112 किंवा मो. 9226514001 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
What's Your Reaction?