सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील विमा कंपन्यांना ताकीद द्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन
सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील
विमा कंपन्यांना ताकीद द्या,अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा इशारा
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) राज्यात मोठ्या प्रमाणात गारपिटी व अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या गंभीर परिस्थितीचे कसलेही सोयरसुतक नाही. त्यामुळेच राज्यात अशी भयावह स्थिती असताना सुद्धा ते इतर राज्यात निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यांना शेतकर्यांच्या या नुकसानीचे गांभीर्य नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकार
शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असल्याची सडकून टीका केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बुलढाणा, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या संबंधित नुकसानीची माहिती दिली.
यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले. यामध्ये मराठवाड्यातील सर्व विभागातील पिकांचे सर्वसमावेशक पंचनामे करण्यात यावे. ज्या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्या मंडळात सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेडनेटचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून त्याचा समावेश नुकसान भरपाईत करण्यात यावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची सूचना ऑनलाईन पध्दतीने देताना त्यात संकेतस्थळ (साईट) हे हँग झाल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे नुकसानीच्या सूचना अर्ज ऑफलाईन घेणे, ऑनलाईन सूचना घेण्याची कालमर्यादा, मुदत वाढविण्याबाबत संबंधित विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत आदी सूचना दानवे यांनी केल्या.
पिक विमा कंपन्यांच्या बेजबाबदार धोरणाबाबत कडक ताकीद देण्यात यावी अन्यथा शिवसेना पद्धतीने त्यांना समज देण्यात येईल असा इशारा दानवे यांनी दिला. तसेच या अवकाळी पावसामुळे झालेल्या तात्कालिक व दूरगामी नुकसानीचे सर्वंकष, सर्वसमावेशक पंचनामे जलद गतीने करून शेतक-यांना रुपये 50 हजार प्रति हेक्टरी मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दिवाळीच्या मुहूर्तावर केलेली घोषणा हवेतच...
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील सर्व शेतकर्यांचा हा सण गोड होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री यांनी केली. मात्र शेतकर्यांची दिवाळी अजुनही गोड झाली नाही. पीक विमा अजुनही मिळाला नाही. असे असतानाही राज्यातील फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त घोषित केले. संपूर्ण राज्यात दुष्काळ घोषित करून गरजवंत शेतकर्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाज अधिवेशनात उठविणार
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बुलढाणा, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यामध्ये बुलढाणा येथील पळसखेडा, तुळजापूर जालन्यातील राजेवाडी व औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगांव या गावांचा समावेश होता. यावेळी त्यांनी येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांशी संबंधित विषयाबाबत संवाद साधला. शेतपीक व फळ बागाच्या नुकसानीची माहिती घेत आगामी अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
या बैठकी दरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले, शेतकरी सेना विभाग प्रमुख वसीम देशमुख, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, राजू राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे , अविनाश पाटील, अविनाश गलांडे पाटील, अविनाश पाटील, बप्पा दळवी, बंडू ओक, संजय निकम, तालुकाप्रमुख संजय मोटे, सुभाष कानडे ,आनंद पाटील ,मनोज पेरे, रघुनाथ घारमोड़े, शंकर ठोंबरे,
शहरप्रमुख विजय वाघचौरे ज्ञानेश्वर डांगे, सुदर्शन अग्रवाल, माजी नगरसेवक राजू इंगळे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, युवा अधिकारी बाबासाहेब मोहिते शुभम पिवळ , मा.नगरसेवक मनोज गांगवे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, संपर्क संघटक सुनीता आऊलवर, सह संपर्क संघटक सुनीता देव व समन्वयक कला ओझा उपस्थित होते.
What's Your Reaction?