40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात...!
40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)-दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाचे बिल मंजूर करून चेक काढून देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय पिराजी जोंधळे (वय 48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी कन्नड तालुक्यातील मकरनपूर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे रेल कनकावती नगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉकचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे 8 लाख 20 हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. संबंधित बिलाचा धनादेश (चेक) काढून देण्यासाठी ग्रामसेवक विजय जोंधळे यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर 3 जून रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपी विजय जोंधळे यांनी 40 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडीनंतर त्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मकरनपूर ग्रामपंचायत कार्यालयात पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत कारवाई केली. यावेळी तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच आरोपी विजय जोंधळे यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत वन प्लस कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातून लाचेची 40 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक भास्कर नवले करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सापळा पथकात पोलीस हवालदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, राम गोरे आणि चांगदेव बागुल यांचा सहभाग होता.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?