अमरावती महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी...!
भाजपला मतदान करणाऱ्या ‘त्या’ नगरसेविकेची ‘एमआयएम’मधून हकालपट्टी...! म्हणाल्या, कोणत्याही कारवाईस तयार…प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची कार्यवाही प्रभारी पुंजानी यांना कारणे दाखवा नोटीस...
अमरावती, दि.6(डि-24 न्यूज)- अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएम (मजलिस - ए- इत्तेहादुल मुस्लिमीन) च्या एका नगरसेविकेने भाजपचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान केल्याने खळबळ उडाली. यानंतर त्या नगरसेविकेने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना देखील पाठिंबा दिला. या निवडणुकीत एमआयएमने तठस्थ राहण्याची भूमिका घेतली असताना या नगरसेविकेने भाजपला दिलेला पाठिंबा चर्चेत आला आहे.
मीरा कांबळे असे या नगरसेविकेचे नाव आहे. त्या बडनेरा जुनी वस्ती प्रभागातून निवडून आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या देखरेखीखाली आणि महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. उमेदवारी मागे घेण्यासाठी पंधरा मिनटांचा अवधी देण्यात आला होता; मात्र कोणाही उमेदवाराने माघार न घेतल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.
सुरूवातीला महापौरपदाची निवडणूक पार पडली. महापौरपदाच्या निवडीसाठी हात उंचावण्याची सूचना होताच नाट्यमय घडामोडींमध्ये महायुतीच्या नगरसेवकांसोबत मीरा कांबळे यांनीही हात वर केला. ‘चूक झाली असावी’ असा अंदाज घेत एमआयएमच्या गटनेत्यांनी त्यांना हात खाली करण्यास सांगितले, मात्र त्यांनी नकार दिला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही त्यांनी आपला हात उंचावलेलाच ठेवला.
इम्तियाज जलील यांनी केली नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी...प्रभारी पुंजानी यांना कारणे दाखवा नोटीस...
मीरा कांबळे यांची एमआयएममधून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी इरफान यांनी ही घोषणा केली. पक्षाला गद्दारांची गरज नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे, आपण स्वतंत्र विचारांवर ठाम राहणार असून पक्षांतर्गत कोणत्याही कारवाईस तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मीरा कांबळे यांनी व्यक्त केली. पहिल्याच सर्वसाधारण सभेत फूट दिसून आल्याने एमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एमआयएमचे सभागृहात 12 सदस्य आहे. 11 सदस्य तठस्थ राहिले. केवळ मीरा कांबळे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. एमआयएमने आपल्या सदस्यांसाठी पक्षादेश (व्हीप) जारी केला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली, तरी त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येईल काय, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. महायुतीकडे भाजपचे 25, युवा स्वाभिमानी पक्षाचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 असे एकूण 51 सदस्य निश्चित होते. त्यात शिवसेना (शिंदे गट)चे 3 आणि एमआयएमच्या एका नगरसेविकेची भर पडली. आता एमआयएम पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?