आयुक्त तुकाराम मुंढें एक्शन मोड मध्ये, गुटखा माफियांना दनका, एका दिवसात 33 जण अटक...!

 0
आयुक्त तुकाराम मुंढें एक्शन मोड मध्ये, गुटखा माफियांना दनका, एका दिवसात 33 जण अटक...!

गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा दनका..! एका दिवसात 33 जण अटकेत, 28 आस्थापना सील

मुंबई, दि.30(डि-24 न्यूज)-

अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारताच त्यांनी भेसळयुक्त दूध, खवा, निकृष्ट दर्जाचे तुप, रसायनयुक्त आंबे, गुटखा व अन्य खाद्य वस्तूंच्या तपासणीचा बडगा उगारताच राज्यात खळबळ उडाली आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात तब्बल 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 28 आस्थापनांवर कारवाई करत ती सील करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ही धडक मोहीम सुरू केली आहे.

29 मे 2026 रोजी बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

बृहन्मुंबई येथे 2 ठिकाणी कारवाई, 2 जण अटकेत, कोकण विभागात 20 आस्थापनांवर कारवाई, 21 जण अटकेत, पुणे विभाग 8 ठिकाणी धाड, 8 आरोपी अटकेत, नाशिक विभाग कारवाई, 1 जण अटकेत छत्रपती संभाजीनगर विभाग कारवाई, एक आरोपी अटकेत.

या सर्व कारवायांमध्ये 6 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आणि FDA अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेतले. 

तक्रारींसाठी येणार नवे अॅप आणि टोल-फ्री क्रमांक :

नागरिकांना भेसळयुक्त किंवा संशयास्पद खाद्यपदार्थांबाबत तक्रार करता यावी यासाठी FDA कडून लवकरच विशेष मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय तक्रारींसाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांना थेट प्रशासनाशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे. 

'आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही' :

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. प्रतिबंधित पदार्थांची विक्री, उत्पादन किंवा भेसळ आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

नागरिकांना आवाहन-

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास नागरिकांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा पत्ता, संशयित पदार्थाची माहिती आणि संपर्क तपशील देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow