अल्पसंख्याक आयुक्तालय व मार्टीत वक्फ बोर्डाचे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर, समाजवादीचा विरोध
हज हाऊस, अल्पसंख्याक आयुक्तालय आणि मार्टीमध्ये प्रतिनियुक्तीवरील वक्फ मंडळ कर्मचाऱ्यांना मूळ सेवेत परत पाठवण्याची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हज हाऊस, अल्पसंख्याक आयुक्तालय आणि अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) येथे प्रतिनियुक्तीवर ठेवण्यात आल्याने वक्फ मंडळाच्या मूळ कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. या कर्मचाऱ्यांना तात्काळ मूळ सेवेत परत बोलावण्याची मागणी पक्षाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्याकडे केली आहे.
हज हाऊसमध्ये आजपासून सुरू झालेल्या वक्फ बोर्डाच्या बैठकीत हे निवेदन समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव रियाजोद्दीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन शासन निधीतून न देता राज्यातील नोंदणीकृत मशिदी, दर्गाह, खानकाह, कब्रस्तान आणि इतर वक्फ संस्थांकडून जमा होणाऱ्या सात टक्के वक्फ निधीतून दिले जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार थेट वक्फ संस्थांवर पडत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अनेक अधिकारी आणि कर्मचारी हज हाऊस, अल्पसंख्याक आयुक्तालय व मार्टी येथे कार्यरत असून, त्यांचे वेतन आजही वक्फ निधीतून दिले जात आहे. त्यामुळे वक्फ मंडळामध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून वक्फ मालमत्तांचे संरक्षण, नोंदणी, अतिक्रमणविरोधी कारवाई, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रशासकीय कामे प्रलंबित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील वक्फ संस्थांकडून जमा होणारा निधी हा वक्फ संस्थांच्या विकास आणि हितासाठी वापरला जाणे अपेक्षित असताना त्याचा वापर इतर शासकीय कार्यालयांच्या मनुष्यबळासाठी करणे योग्य नसल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24 तासांच्या आत मूळ सेवेत परत बोलावण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा समाजवादी पक्ष राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर
सपाचे प्रदेश सचिव डॉ. रियाज देशमुख,
प्रदेश सचिव अकील शेख, शेख अयूब पटेल,
शाहीन पठाण, मोहम्मद ईसा यासीन, शेख गौस शेख इब्राहिम, मिर्झा सलमान बेग,
सय्यद ताबिशोद्दीन यांची सही आहे.
What's Your Reaction?