इमाम मौज्जन काॅलनीसाठी वक्फ बोर्डाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात
इमाम मौज्जन काॅलनीसाठी वक्फ बोर्डासमोर बेमुदत उपोषण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- शहरातील गरजू इमाम मौज्जन यांच्या निवास, उपजिविका आणि धार्मिक सेवेसाठी स्थायी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने इमाम मौज्जन काॅलनी स्थापन करण्यासाठी वक्फ बोर्डाची जागा दिर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर मिळावी यासाठी वेळोवेळी संघर्ष अल्पसंख्याक कामगार संघटनेचे अध्यक्ष अहमद जलिस यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. वक्फ बोर्डाच्या वतीने फक्त आश्वासन मिळाले म्हणून आज दुपारपासून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय, पवनचक्की येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार पर्यंत मागणी मान्य केली नाही तर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे मांडकी गट नंबर 66/3 मधील 27 एकर जागेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी विश्वस्त दर्गा हजरत नूरुल हुदा खानका मस्जिद व कब्रस्तान दिल्ली गेट यांना पत्र पाठवून वक्फ मालमत्ता भाडे पट्ट्याने देण्यासाठी केंद्रीय वक्फ कायदा व वक्फ अधिनियम 1995 चे कलम 56 तरतूदीनुसार तसेच वक्फ मालमत्ता भाडे पट्टा नियम 2014 सुधारित नियम 2015 व 2020 मध्ये प्रक्रिया पूर्ण करून भाडे पट्टा प्रस्ताव मंजुरीसाठी वक्फ कार्यालयास सादर करावा असे पत्र दिले होते. वक्फ मालमत्ता भाडे पट्टा नियम 2014 सुधारित नियम 2015 व 2020 ची कलम 13 प्रमाणे बोर्ड किंवा मुतवल्ली यांनी भाडे पट्ट्याच्या अर्जावर तीस दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे. परंतु तीस दिवसांची कालावधी/ मुदत लोटल्यानंतर वक्फ बोर्ड किंवा विश्वस्त/ मुतवल्ली यांनी संबंधित अर्जावर आजपर्यंत निर्णय घेतला नाही. या विषयावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार, वक्फ व अल्पसंख्याक मंत्री, चेअरमन वक्फ बोर्ड, सिईओ यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी सिद्दीकी सलीमोद्दीन, आझाद युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मोबीन अन्सारी, बाबा कुरेशी, मौलाना अब्दुल रशीद, खुर्रम अब्दुल रशीद, शेख फैयाज, जावेद पटेल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?