एड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, वाहनाची काच फुटली...

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, वाहनाची काच फुटली, जालन्यात ओबीसी आंदोलनाला जाताना घडली घटना...
जालना, दि.21(डि-24 न्यूज) -
मराठा आरक्षणाला नेहमी विरोध करणारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका करणारे एड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आंदोलकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते हे जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून पुढे जात होता. पोलिसांनी यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, कारण रस्त्याच्या दुतर्फा मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
यावेळी काही आंदोलकांनी थेट गाडीवर धाव घेत तिच्या काचेवर फटके मारले. ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोर आंदोलकांना ताब्यात घेतले. तोपर्यंत सदावर्ते यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले होते. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत, आजच्या घटनेत मराठा आंदोलकांवर नवीन गुन्हे दाखल झाल्यास मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना अनेक नेते मनोज जरांगे यांच्याविरुद्ध बोलण्याचे टाळत होते. मात्र, त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या मागणीला सातत्याने विरोध केला होता. त्यांची हीच भूमिका या हल्ल्याला कारणीभूत ठरली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. हल्ल्यानंतर एड गुनरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
What's Your Reaction?






