एमजीएम हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

 0
एमजीएम हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

एमजीएमच्या हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) एमजीएम विद्यापीठ हे अनेक उपक्रमशील कार्यक्रमांना प्रोत्साहन देणारे विद्यापीठ आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो; या उदात्त हेतूने सेवाभाव हा दृष्टिकोन ठेऊन एमजीएमच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय आणि सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्या संयुक्त योगदानातून 6500 किलोची प्रोटीनयुक्त खिचडी तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून केलेल्या या विक्रमाचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग, सौ. अनुराधा कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, अधिष्ठाता विजया देशमुख, शेफ विष्णू मनोहर, उपकुलसचिव डॉ. परविंदर कौर धिंग्रा, संचालक डॉ. कपिलेश मंगल व सर्व संबंधितांची उपस्थिती होती. 

यावेळी, बोलताना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग म्हणाल्या की, एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी 6500 किलोची तयार केलेली खिचडी हा उपक्रम जगातील एकमेव आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्साह व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. शेफ विष्णू मनोहर यांच्यातील कौशल्ये हे पाहण्यासारखे होते, म्हणून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने अनेक टॅलेंट सर्च केले आहेत, त्यातील हे एक टॅलेंट आहे. यापुढे खिचडीची ओळख राष्ट्रीय डिश म्हणून होईल.

    प्राध्यापक तथा विख्यात शेफ विष्णू मनोहर म्हणाले की, खिचडी बनविण्याचा जगामध्ये प्रथम विक्रम 2000 साली झाला; 2023 या साली एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तांदूळ, विविध डाळी व भाज्या आणि तुपासह विविध 19 घटकयुक्त व्हेजीटेबल खिचडी तयार करून विश्वविक्रम केला. खऱ्या अर्थाने विचाराला कृतीत उतरवून एकतेचा संदेश दिला आहे. संधीचे सोने कसे करावे हे या विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्याकडून शिकावे, एमजीएमची  हॉटेल मॅनेजमेंट ही संस्था विद्यार्थ्यांना कृतीशील बनविणारी देशातील नामांकित संस्था असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

                

 प्रमुख पाहुणे आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग यांच्या हस्ते आयएचएमचे संचालक डॉ. कपिलेश मंगल यांनी 6500 किलोची विश्वविक्रमी खिचडी केल्याचे पदक आणि प्रमाणपत्र स्वीकारले. ही तयार केलेली खिचडी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातील वृद्धाश्रम, अनाथालये, वसतिगृहे, हॉस्पिटल आदी ठिकाणी वितरित करण्यात आली. 

यावेळी, अधिष्ठाता डॉ.एच.एच. शिंदे, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पुष्पा गोरे, डॉ. वैभव जोशी, डॉ. रूपेश भावसार, व किचन टीम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची लेले व वैष्णवी पाटील यांनी केले, तर आभार डॉ. कपिलेश मंगल यांनी मानले.या विक्रमासाठी महावीर बेस्ट प्राईस आणि विझडम करियर एज्युकेशन प्रा.लि. यांचे प्रायोजकत्व मिळाले होते.

यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे अशी मागणी केली. याअगोदर त्यांनी पाककलेत अठरा जागतिक विक्रम केले आहे. जानेवारीत अयोध्या येथे पाच हजार किलो हलवा बनवण्याचा विक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विविध डिश बनवण्याचे व 52 तास कुकींग करण्याचा विक्रम त्यांचे नावे आहेत.

आजच्या या पाककृतीमुळे विद्यार्थींना नवीन उर्जा भविष्यात मिळणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow