ग्रेड पे च्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी केले धरणे आंदोलन

 0
ग्रेड पे च्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी केले धरणे आंदोलन

ग्रेड पेच्या मागणीसाठी तहसिलदार, नायब तहसिलदारांनी केले आंदोलन

सामुहिक रजा घेत विभागीय आयुक्तांना दिले निवेदन आपल्या मागणीचे निवेदन...

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) वर्ग-2 नायब तहसिलदारांचे ग्रेड पे 4800 रुपये करावे, या प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज मंगळवारी सामुहिक रजा घेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार न केल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेने दिला.

महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-2 हे महत्वाचे पद आहे. असे असतानाही नायब तहसीलदारांचे वेतन राजपत्रित वर्ग दोनचे नाही. त्यामुळे ग्रेड पे वाढविण्यात यावे, यासाठी 1998 पासून पाठपुरावा सुरु आहे. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समोर नायब तहसीलदारांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्यासंदर्भात संघटनेमार्फत सादरीकरण झाले होते. परंतू वारंवार पाठपुरावा करुन देखील संघटनेच्या मागणीचा अद्यापही विचार करण्यात आला नाही. अधिक काम, अधिक वेतन या नैसर्गिक न्याय तत्वाने व शासनाच्या धोरणानुसार ही मागणी रास्त असल्याचे संघटनेने नमूद केले.

ग्रेड पे 4800 रुपये करण्यात यावे, या मागणीसाठी संघटनेने 3 एप्रिल 2023 पासून बेमुदत संप पुकारला होता. यादरम्यान, वाढीव ग्रेड पे संदर्भात महसूल विभागाकडून सकारात्मक अभिप्राय सादर केलेल्या प्रस्तावावर 5 एप्रिल 2023 रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांची मान्यता घेण्यात आली. तसेच यापुढील कार्यवाही करण्यासाठी एप्रिलपर्यंत प्रशासकीय कालावधी लागणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. त्यावेळी प्रशासकीय कार्यवाही करुन आवश्यक ते आदेश मे 2023 पर्यंत निर्गमित न झाल्यास पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही संघटनेने पत्राद्वारे दिला होता. पण शासनस्तरावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे संघटनेच्या सदस्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. पहिल्या टप्प्यात मागण्यांचे निवेदन शासनास सादर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी एक दिवसाची सामुहिक रजा घेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विभागीय संघटक विजय चव्हाण, सचिव विद्याचरण कडवकर, सोहम वायाळ, महेंद्र गिरगे, रमेश मुनलोड, सुधाकर मोरे, गणेश सरोदे, एम. एम. काकडे, संदीप साखरे, हेमंत तायडे, व्ही. एस. घुगे, डॉ. गणेश देसाई, तेजस्विनी जाधव, सी. ए. बहुरे, व्ही. के. ढोले, के. जे. काथार, प्रशांत देवढे, प्रणाली तायडे आदी उपस्थित होते.

 या आंदोलनात मराठवाड्यातील 120 तहसीलदार तर 700 हून अधिक नायब तहसीलदारांनी सहभाग नोंदविल्याचा दावा संघटनेने केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow