घरफोडीचा पर्दाफाश, 1 आरोपी अटक, 1.58 लाखांचा मुद्देमाल जप्त...

 0
घरफोडीचा पर्दाफाश,  1 आरोपी अटक, 1.58 लाखांचा मुद्देमाल जप्त...

रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ आरोपी अटक, १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-

देवगाव रंगारी पोलिसांनी रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व देवगाव रंगारी पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय नानासाहेब साळवे (वय ३६, रा. मालंगाव ता. वैजापूर) यांनी १६ मार्च २०२६ रोजी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १४ मार्च रोजी ते कुटुंबासह बाहेर गेले असता १५ मार्च रोजी सकाळी घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील एलसीडी टीव्ही व रोख रक्कम चोरी केली होती. तसेच शेजारी राहणारे मिलिंद धोंडीराम गायकवाड यांच्या घरातही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २९/२०२६ कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५) भा.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयर्सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी केली. तपासात रामेश्वर जंगल्या भोसले (वय २८, रा. पांडेगव्हाण शिवर, ता. आष्टी, जि. बीड) याने साथीदारांसह मोटारसायकलवर येऊन देवगाव रंगारी परिसरात बंद घरांची पाहणी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने १४ व १५ मार्च रोजी रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलूप तोडून घरातील एलसीडी टीव्ही, सोन्याचे दागिने व रोकड चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून १०,००० रुपये किंमतीचा ओनिडा कंपनीचा एलसीडी टीव्ही, १.०४ ग्रॅम सोन्याचे जोड (किंमत १६,००० रुपये), १.१० ग्रॅम सोन्याची डिस्को रिंग (किंमत १७,००० रुपये), १ ग्रॅम मंगळसूत्र पाटल्या (किंमत १५,५०० रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल (पासिंग क्र. MH 16 CN 1479) किंमत १,००,००० रुपये असा एकूण १,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यातील इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले याला अटक करून पुढील तपास देवगाव रंगारी पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयर्सिंग राजपूत, पोउनि महेश घुगे, पोह/८२९ सचिन राठोड, पोह/२०६ सुनील गोरे, पो.अं/१३४ बलबीरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जिवन घोलप, चालक पो.अं/१२०६ शिवाजी मगर यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow