मालमत्तेच्या वादातून मुलाकडून वडीलांची हत्या, बहीणीलाही केले जख्मी, आरोपी अटक...!
सिल्क मिल्स कॉलनीत मालमत्तेच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या...
वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणीवरही हल्ला; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू, आरोपी ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, दि.11(डि-24 न्यूज)- शहरातील सिल्क मिल्स कॉलनी परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलानेच वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या बहिणीवरही आरोपीने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सतारा पोलीस ठाण्यात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी काही तासांत ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जफर करीमुद्दीन पटेल व त्यांचा मुलगा अब्दुल रहमान जफर पटेल (वय 45, रा. सिल्क मिल्स कॉलनी) यांच्यात मालमत्तेच्या वादावरून दीर्घकाळापासून न्यायालयीन वाद सुरू होता. न्यायालयाचा निकाल जफर करीमुद्दीन यांच्या बाजूने लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तहसीलदारांच्या उपस्थितीत तसेच पोलिस बंदोबस्तात संबंधित भूखंडाचा ताबा जफर करीमुद्दीन यांना देण्यात आला.
दरम्यान, या निर्णयावर नाराज असलेला अब्दुल रहमान घटनास्थळी उपस्थित होता. अधिकारी व पोलीस निघून गेल्यानंतर जफर करीमुद्दीन व त्यांची मुलगी भूखंडाची पाहणी करून वाहनाने घरी परतत असताना सायंकाळी सुमारे 6.45 वाजेच्या सुमारास आरोपीने ऑटो-रिक्शाद्वारे त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर वाहन अडवून वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या बहिणीवरही आरोपीने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. जखमी जफर करीमुद्दीन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या शरीरावर 15 ते 20 टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही तासांत आरोपी ताब्यात...
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. आरोपी पडेगाव परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने शोधमोहीम राबविली. यामध्ये पोलीस कर्मचारी सुनील बेलकर, दिगंबर राठोड व महेश गोळे यांचा समावेश होता. रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मिटमिटा परिसरातील नातेवाईकाच्या घरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटकेवेळी आरोपीने झोपेच्या गोळ्या घेतल्याचा संशय असून तो औषधांच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हत्या प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपी अब्दुल रहमान याच्याविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे पुढील तपास
करीत आहेत.
What's Your Reaction?