चंपा चौक रस्ता नेमका कोणत्या गल्लीतून, 15 ऑगस्ट नंतर कळणार...!

चंपा चौक रस्ता नेमका कोणत्या गल्लीतून जाणार...?
15 ऑगस्टनंतर मार्किंगला होणार सुरूवात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12 (डि-24 न्यूज) - विकास आराखड्यातील चंपा चौक ते जालना रोड या 30 मीटर (शंभर फुट) रस्त्यासाठी दोन दिवसांपासून सुरू असलेला टोटल स्टेशन सर्वे आज संपला. रेंगटीपुऱ्यापासून पुढे भवानीनगर, दत्तनगर, दादा काॅलनी, कैलासनगरात लहान लहान गल्ल्या असल्याने या गल्ल्यामध्ये महानगरपालिकेच्या 2 पथकांनी सर्वे केला. नव्याने होणारा हा रस्ता नेमका कोणत्या गल्लीतून जाणार आहे, असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर आहे. तर बंदोबस्तांवरील पोलीस आणि माजी सैनिकांमुळे नागरिकांचे प्रश्न अनुत्तरीतच आहे. 15 ऑगस्टनंतर मार्किंगला सुरूवात होईल अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानापासून (दमडी महल) सुरू होणारा 30 मीटर रस्ता चंपा चौकपर्यंत तयार आहे. तिथून पुढे हा रस्ता रेंगटीपुऱ्यापर्यंत 9 मीटरचा आहे. रेगंटीपुरा येथे हा रस्ता संपला असून, तिथून डावीकडे जिन्सी पोलीस ठाणे आणि उजवीकडे जुना मोंढ्यात जाफर गेटकडे हा रस्ता जातो. चंपा चौक ते जालना रोड हा सुमारे 2 किमी. रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी चंपा चौक येथील मशिदीत नागरिकांशी संवादही साधला होता. त्यानंतर टोटल स्टेशन सर्वेला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. आज या सर्वेचे काम पूर्ण झाले. भवानीनगर, दत्तनगर, दादा कॉलनी, कैलासनगर या भागात लहान लहान गल्ल्या असल्याने मनपाच्या पथकाने या गल्ल्यांमध्ये उभे राहून सर्वेचे काम पूर्ण केले. तर परिसरातील रहिवाशांमध्ये नेमका रस्ता कुठून जाणार, कधीपासून पाडापाडी सुरू होणार, असे अनेक प्रश्न चर्चिले जात होते. या गल्लीतून नाही, पुढच्या गल्लीतून रस्ता जाणार आहे, असे म्हणत नागरिक एकमेकांना धीर देत होते.
आता सर्वे करणारी एजन्सी नकाशा तयार करून देईल. हा नकाशा डीपीनुसार मॅच करून त्यास टीएलआर (भूमापन कार्यालय) कडून मंजूर करून घेण्यात येईल. या कामाला चार-पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर नकाशानुसार रस्त्यासाठी मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात येईल. मार्किंग केल्यावरच नेमका रस्ता कुठून जाणार, हे स्पष्ट होईल. हा रस्ता कुठेही वळविलेला नाही, तो सरळच आहे, काही ठिकाणी किचिंत वळण असेल, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?






