दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 0
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’

एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज):- सुकर जीवनासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. दिव्यांगांसाठीच्या शिबिराचे आयोजन करतांना सर्व संबंधित विभागांनी विशेष काळजी घ्यावी व खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. 

 समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.बी, चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, महानगरपालिकेचे समाज कल्याण उपआयुक्त लकीचंद चव्हाण, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे ए.के.शेख, जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ. महेश लड्डा, बार्टी कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी चौरे, महाज्योती कार्यालयाचे चंद्रशेखर वडले, यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते. 

 जिल्ह्यातील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागामार्फत दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, आरोग्य तपासणीची सुविधा शिबिर स्थळी उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगत्व प्रमाणपत्राची नोंदणी, आरोग्य तपासणी, कायदा व सुव्यवस्था विषयक सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्याव्या. ग्रामीण भागातील व शहरी भागातील दिव्यांगांसाठीचे नियोजन नगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाने करावे. गावामध्ये ग्रामसेवकांच्या माध्यमातून शिबिराची माहिती दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. 

 मार्च अखेर तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करावे. स्थळ पाहणी करून दिव्यांगाच्या सोयीचे ठिकाण निश्चित करावे.पोलीस, समाज कल्याण,कौशल्य विकास व रोजगार स्वयंरोजगार विभाग, जिल्हा अग्रणी बँक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सदस्य सचिव जिल्हा जात पडताळणी समिती, मुख्याध्यापक सर्व शाळा, प्रकल्प संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण यांच्यासह तहसिलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद, शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण या सर्व विभागांच्या अंतर्गत दिव्यांगांची नोंदणी, सर्वेक्षण आणि त्यांना देय असलेल्या सर्व विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow