नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपीची काढली धिंड...

नशेच्या गोळ्यांसह पकडलेल्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड... उशिरा रात्रीपर्यंत तपासासाठी एका ठिकाणी पोलिसांनी काही अंमली पदार्थ सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -जिन्सी पोलिसांनी किराडपुरा परिसरात नशेच्या बटन गोळ्यांची विक्री करणारा आरोपी सैयद अरबाज सैयद इस्माईल (वय 29) याला अटक केली. ही कारवाई पाणी का बंबा परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून 110 बटन गोळ्या, मोबाईल व मोपेड असा एकूण सुमारे 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
शनिवारी अरबाजला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. रविवारी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अरबाजची किराडपुरा परिसरात धिंड काढली. शर्मेमुळे अरबाजचे डोके खाली होते. हातकड्या घालून पोलिसांनी किराडपुरा, राम मंदिर, आझाद चौक, रोशन गेट, चंपा चौक परिसरातून त्याची फेरी काढली. परिसरातील नागरिकांनी व्हिडिओ व फोटो काढले.
पोलिस उपनिरीक्षक प्रताप साळवे यांच्या माहितीनुसार, आरोपीला शहरातील एका व्यक्तीकडून नशेच्या गोळ्या विक्रीसाठी दिल्या होत्या. त्या व्यक्तीचा शोध सुरू असून आणखी काही प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे. अरबाज ग्राहक पाहून विक्री करीत होता. त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का याची चौकशी सुरू आहे.
नशामुक्त शहर मोहीम करण्यासाठी प्रयत्न...
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर नशामुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. “कुणालाही सोडू नका, कडक कारवाई करा,” असे आदेश क्राईम मिटिंगमध्ये सर्व ठाणेदारांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी परिसरातून 1 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. नशेच्या सौदागरांची फेरी काढून नागरिकांना हा नशेचा व्यापारी आहे, हे दाखवले जात आहे.
What's Your Reaction?






