भरपावसात कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्का जाम आंदोलन, मंत्रालयात घुसण्याचा दिला इशारा...

भरपावसात कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन, मंत्रालयात घुसण्याचा दिला इशारा...
क्रांतीचौक व अमरप्रित चौक केला जाम, बच्चू कडूसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...शहर पोलिस बंदोबस्तात सहा तास ताटकळले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - आज शहर भरपावसात चक्का जाम आंदोलनाने दणाणले. प्रहारचे अध्यक्ष आंदोलनात येणार म्हणून कार्यकर्त्यांना व बंदोबस्तात तैनात पोलिसांना सहा तास ताटकळावे लागले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतीमालाला भाव, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, मच्छीमार, मेंढपाळांचे प्रश्न यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते तथा संस्थापक अध्यक्ष बच्चू कडून यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी तब्बल सहा तास प्रतिक्षा केल्यानंतर क्रांतीचौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर अमरप्रित चौकात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुन्हा रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडले.
चक्का जाम आंदोलनासाठी सकाळी 11 वाजेपासून क्रांतीचौकात कार्यकर्ते जमा झाले होते. बच्चू कडू हे अमरावतीहून शहरात आले. यावेळी शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिवाजी गाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांसह शेतकरी, दिव्यांग बांधवांनी पावसात भिजत उपाशीपोटी तब्बल 6 तास त्यांची प्रतिक्षा केली. सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे क्रांतीचौकात आगमन झाले. या आंदोलनाला एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, काँग्रेसचे नेते तथा व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, एमआयएमचे नासेर सिद्दीकी, जमीर अहेमद कादरी, अयूब जागिरदार, आरेफ हुसेनी, शेख रफीक, माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनीही आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झालीच पाहिजे. सातबारा कोरा झालाच पाहिजे. दिव्यांगांना 6 हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे. आपला भिडू बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो. अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भर पावसात आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिला. शेकट्याजवळील फेरणजळगाव येथील मेंढपाळांसह मेंढ्याही आंदोलनासाठी आणण्यात आल्या होत्या.
क्रांतीचौकातील आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन हेही सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पदयात्रा केली. त्यांनी बच्चू कडू यांच्या रक्ताळलेले पाय धुवून चंदन लावले. शेतकऱ्याच्या कैवाऱ्यांची सेवा माझ्या हातून घडली, असे याप्रसंगी प्रकाश महाजन म्हणाले.
शेतकरी, दिव्यांग व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असल्याने पाठींबा - इम्तियाज जलिल...
अनेक वर्षापासून प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांचा लढा सुरू आहे. शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल. पण दुर्दैवाने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. सरकार फक्त घोषणा करत असल्याचा हा परिणाम आहे. माझा बच्चू कडू यांना पहिल्यापासून पाठिंबा आहे, उद्याही राहणार. कडू यांनाच नाही, तर कर्जमाफी, दिव्यांगांचे मानधन आदी मागण्यांसाठी दुसऱ्या पक्षानेही आंदोलन केले तर त्यांनाही माझा पाठिंबा राहिल., असे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले. बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या शपथपत्रावर उत्तर देण्यास इम्तियाज जलिल म्हणाले तो विषय मी आता सोडला आहे. त्यांनी आणखी एक शपथपत्र काढावे त्यावर लिहावे मी शेतक-यांची कर्जमाफी करणार. त्यांना मोठ्या अपेक्षेने तेथील जनतेने निवडून दिले विधानसभेच्या कॅन्टिनमध्ये मारहाण करण्यासाठी निवडून दिले नाही असे आमदार विधानसभेची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप केला. कृषीमंत्र्यांवर सुध्दा त्यांनी हल्लाबोल केला. सरकार काही ठोस निर्णय घेणार की नाही असले मंत्री सरकारमध्ये आहेत हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे जलिल यांनी सांगितले.
हे रामराज्य आहे की रावण राज्य,
कृषीमंत्र्यांनी दाखवला रमीचा पर्याय - बच्चू कडू
तारीख न सांगता मेंढपाळांसह मंत्रालयात घुसण्याचा दिला इशारा...
शेतीमालाला भाव नाही, दूधाला भाव नाही, शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळांचे जगणे मुश्किल झाले आहे. हक्कासाठी शेतकरी झगडत आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या कृषीमंत्री काशिनाथ कोकाटे यांनी रमीचा पर्याय आमच्यासमोर दाखवला आहे. काहीच जमत नसेल तर रमी खेळा.. उरलेसुरले सगळे फेडून टाका, अशी व्यवस्था कृषीमंत्र्यांने केल्याचे आम्ही पाहत आहोत. अशा शब्दांत प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे आंदोलन शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या हक्कासाठी असून, आता थांबणार नाही. कर्जमाफीसह इतर मागण्या मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पुढील आंदोलन तारीख न सांगता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. मेंढपाळ घेवून मंत्रालयात घुसू, असा इशाराही कडू यांनी यावेळी दिला. शहरात आयोजित चक्काजाम आंदोलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले जाती-धर्माच्या आंदोलनाला मोठी गर्दी होते त्याला वेळ लागत नाही. मात्र शेतकरी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठीच्या आंदोलनाला गर्दी होत नाही. असे म्हणत आंदोलनात सहभागी कार्यकर्ते, नागरिकांचे त्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांचे जीवन कठीण झाले आहे. मेंढपाळांना चराईला जागा नाही. मासेमारीचे पूर्ण ठेके हे मुंबईच्या काही लोकांच्या हातात गेलेले आहेत. मच्छिमाराला 1 किलो झिंग्याचे 100 रुपये तर ठेकेदाराला 1200 रुपये मिळतात असे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून उद्योगपतींचे घर भरण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर्षी पिकपाणी चांगले आहे म्हणून यंदा कर्जमाफी देण्याची गरज पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणत आहे. ज्वारीचा हमीभाव 3300 रुपये क्विंटल असताना 1500 रुपयांना विकावी लागते. गेल्यावर्षी सोयाबीनबाबतही अशीच परिस्थिती होती. पिक चांगले पिकले तरी, पण हरामखोरांनी लुटले. उत्पादन जास्त येवून फायदा नाही, तर उत्पन्न जास्त मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांचे हात थांबले तर त्यांचे पोट थांबते, शेतकऱ्यांचे हात थांबले तर तुमचे अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या, इथून पुढे पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत पुन्हा संपाची हाक देणार असल्याचेही ते म्हणाले.
आमच्या छत्रपतींनी वतनदारी बंद केली. त्यामुळे घरातील लोकंच छत्रपतींच्या विरोधात गेले. वतनदारी शिर्केना भेटली नाही म्हणून आमच्या संभाजीराजांना बलिदान द्यावे लागले. पण या सरकारने रमी स्विकारून 9 हजार कोटी रुपये कर जमा केला. याचा निषेध आहे. आमच्या मृतदेहावर पाय ठेवून तुम्ही राज्य चालवित असाल, तर याच्यासारखे दुर्दैव नाही. याला रामराज्य म्हणायचे कि रावणराज्य म्हणायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
What's Your Reaction?






