उद्या साजरा होणार आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस...!
उद्या साजरा होणार अल्पसंख्याक हक्क दिवस...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी या दिवशी शासकीय कार्यालयात हा दिवस साजरा करुन अल्पसंख्याक समाजाचे हक्क व शासकीय योजनेची माहिती देण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने परिपत्रक काढून जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे संयुक्त राष्ट्रांनी दि.18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहिरनामा स्वीकृत करुन प्रस्तूत केला आहे. त्यानुसार दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस साजरा केला जातो.
त्यास अनुसरून अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून पाळण्याच्या सूचना संदर्भ क्रं.2 वरील परिपत्रकान्वये दिल्या आहेत. तसेच सदर दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणिव करुन देणे याकरीता विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित केले आहे.
राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शाळा व महाविद्यालयात अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरीता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.
इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांकरीता भित्ती पत्र स्पर्धा आणि निबंध स्पर्धा.
इयत्ता 11 वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करण्यात यावे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजसेवी संस्थांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करून अल्पसंख्याक नागरीकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. हा उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असेल असे परिपत्रक आयोगाचे सचिव सारंगकुमार पाटील यांच्या सहीने निघाले आहे.
What's Your Reaction?






