मतदान केंद्र स्तरीय अधिका-यांनी मतदारांच्या गृहभेटीतच कामकाज करावे - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांच्या गृहभेटीतच कामकाज करावे -जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर, दि.19(डि-24 न्यूज)- मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)यांनी मतदारांच्या गृहभेटीद्वारे व त्यानंतर आवश्यकतेनुसार आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरूनच कामकाज करावे, अन्यत्र कोणत्याही ठिकाणी कामकाज करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत.
सध्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्या कामासाठी जिल्ह्यात 3264 बी.एल.ओ.नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बी. एल. ए.) ही नेमले आहेत.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे असा निवडणूक आयोगाचा त्यामागील हेतू आहे.
तथापि, काही बी.एल.ओ. हे काही राजकीय पक्ष, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या कार्यालयात बसून कामकाज करीत असल्याचे काही माध्यमातून समोर आले आहे.
बी.एल.ओ.यांनी आपले कामकाज मतदारांच्या गृहभेटी करून व नंतर आवश्यकतेनुसार आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरून वा शासकीय कार्यालयातूनच करणे अपेक्षित आहे. बी.एल.ओ.हे त्या व्यतिरिक्त अन्यत्र कामकाज करतांना आढळल्यास त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?