मनमानी पध्दतीने नागरीकांच्या मालमत्ता पाडू नका - अंबादास दानवे

मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नाही
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मनपा प्रशासनाला खडेबोल
संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) - संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येत आहे. मात्र अनेक नागरिकांनी वैध मालमत्ता सुद्धा अतिक्रमण म्हणून महानगरपालिका पाडत आहे. मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नसल्याचे खडेबोल शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुनावले. आज मनपा प्रशासनाची बैठक घेऊन अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत व पाणी पुरवठा प्रश्नांबाबत दानवे यांनी प्रशासनाला जाब विचारला.
महानगरपालिकेने किती वैध व अवैध मालमत्ता पाडल्या याची नोंद आहे का... ? शहर विकासासाठी म्हणून पाडलेल्या मालमत्तांना भरपाई कशा प्रकारे देणार असल्याचा प्रश्न दानवे यांनी विचारला.
महानगपालिका विकासासाठी अतिक्रम हटवत आहे तर काही हरकत नाही. मात्र वैध मालमत्ता कसलीही नोटीस न देता पाडू नये असा सूचक इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
महानगरपालिका रस्ते वाढवत असेल तर विरोध नाहीये. सर्वसामान्य माणसाचा विचार करून भूसंपादित जमिनीचा मोबदला द्यावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडलेल्या मालमत्ताचे नुकसान भरपाईची मोबदला किती रूपयापर्यंत जातो, असा सवाल दानवे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला. रोख स्वरूपात अथवा विविध योजनांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
महानगरपालिकेत दलालांचा सुसाट वाढला असून दलालांशिवाय काम होत नाही. मनपात धंदा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे..टीडीआर साठी दलाल लागतात. त्यांच्याशिवाय फाईल मंजूर होत नसल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, नितीन पवार व संजय हरणे उपस्थित होते.
What's Your Reaction?






