शहरासाठी एक कॅमेरा, पोलिसांचे नागरीकांच्या सहभागातून सुरक्षित शहरासाठी वाटचाल करण्याचे आवाहन...!

 0
शहरासाठी एक कॅमेरा, पोलिसांचे नागरीकांच्या सहभागातून सुरक्षित शहरासाठी वाटचाल करण्याचे आवाहन...!

शहरासाठी एक कॅमेरा” : पोलिसांचे आवाहन; नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित शहराकडे वाटचाल

छत्रपती संभाजीनगर, दि. 26 एप्रिल : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संभाजीनगर शहर पोलिसांनी “शहरासाठी एक कॅमेरा, सर्वांच्या सुरक्षेसाठी” हा उपक्रम सुरू केला असून, पोलीस आयुक्तांनी नागरिकांना व्यापक आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसराच्या सुरक्षेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी नागरिकांना आपल्या घरांमध्ये, दुकाने, सोसायट्या, हॉटेल्स, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व खासगी संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः किमान एक कॅमेरा सार्वजनिक रस्त्याकडे (रोड फेसिंग) ठेवावा, जेणेकरून रस्ते, चौक आणि नागरिकांची वर्दळ स्पष्टपणे रेकॉर्ड होऊ शकेल.

लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू ठेवावेत, कॅमेऱ्यांची दिशा योग्य ठेवावी तसेच रात्री स्पष्ट चित्रणासाठी नाईट व्हिजन किंवा पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यकता भासल्यास नागरिकांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, असेही सांगण्यात आले.

ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तेथे नवीन कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले असून, बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची नोंद जवळच्या पोलीस ठाण्यात करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे गुन्हे नियंत्रणात ठेवणे, तपास प्रक्रियेला गती देणे आणि शहर अधिक सुरक्षित बनविणे शक्य होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संभाजीनगर पोलिसांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे तो अधिक प्रभावी ठरेल. विशेष म्हणजे अमरावती शहर पोलिसांनीही सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी अशाच प्रकारची मोहीम राबविली होती. ती आजही यशस्वीपणे सुरू असून गुन्हे रोखणे व गुन्ह्यांचा तपास लावणे यासाठी मोठी मदत होत आहे.

अमरावतीप्रमाणेच राज्यभर अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले, तर गुन्हे रोखण्यासोबतच गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच “तुमचा कॅमेरा - सर्वांची सुरक्षा” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमधील परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow