शाळेच्या संच मान्यता 31 जुलैच्या पटसंख्येच्या आधारे होणार - प्रा. मनोज पाटील

शैक्षणिक वर्ष 2025-26 ची संच मान्यता 31 जुलैच्या पटसंख्येच्या आधारे होणार...
शिक्षण आयुक्तांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना...
संच मान्यता 31 जुलै अथवा 30 सप्टेंबरच्या पटसंख्येच्या आधारे होणार याचा संभ्रम दूर करून पूर्वी प्रमाणेच संच मान्यता व विद्यार्थ्यांचे लाभ देण्यासाठी 30 सप्टेंबर हाच निकष कायम ठेवावा ...!!!
प्रा. मनोज पाटील
कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ
मुख्याध्यापक महासंघाची शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व संचालक श्री महेश पालकर यांच्या समवेत चर्चा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) 2024-25 ह्या शैक्षणिक वर्षापर्यंत शिक्षक संचमान्यता व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमा अंतर्गत मिळणारे लाभ हे 30 सप्टेंबरच्या पटसंख्येच्या आधारे दिले जायचे. परंतु राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त यांनी 26 जून 2025 रोजी शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत, यावर्षी पासून शिक्षक संचमान्यता व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमा अंतर्गत देण्यात येणारे लाभ देण्यासाठी 30 सप्टेंबरच्या विद्यार्थी पटाऐवजी 31 जुलैच्या पटावर संचमान्यता व लाभ देण्याचे सुचित केले आहे.
त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी तशा सुचना त्यांच्या जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. राज्यात सर्वत्र 15 जून आणि विदर्भात 23 जूनला शाळा सुरू होतात. त्यानंतर एक ते दीड महिना विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू राहते. त्यानंतर सर्व प्रवेशीत विद्यार्थ्यांची जनरल रजिस्टरला नोंद घेणे, विद्यार्थी प्रमोशन, युडायस, सरलला अपडेट करणे, आधार अपडेट करणे या सर्व ऑनलाईन प्रक्रिया होवून शाळेचा पट तयार होतो. ही सर्व प्रक्रिया 31 जुलै पर्यंत पुर्ण होणे शक्य नाही, परिणामी शाळेची पटसंख्या आणि आधार अपडेट व सर्व ऑनलाईन प्रक्रिया होवून शाळेची ऑनलाईन पटसंख्या यात तफावत राहणार आहे. त्यामुळे पटसंख्या असूनही सर्व ऑनलाईन प्रकिया पुर्ण न झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होतील आणि विद्यार्थी लाभापासून वंचित राहतील.
त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गंभीर प्रश्न निर्माण होतील. ते टाळण्यासाठी संचमान्यता व विविध उपक्रमांतर्गत लाभ पुर्वीप्रमाणे 30 सप्टेंबरच्याच पटसंख्येवर कायम ठेवावेत व गंभीर समस्या व अप्रिय घटना टाळाव्यात.
तसेच यावर्षीची संच मान्यता ही udise plus वर न करता स्टुडन्ट पोर्टलवरच करण्यात यावी यु-डायस प्लस वर संच मान्यता झाल्यास ग्रामीण भागातील शाळांना ही प्रचंड अडचणीची ठरणार आहे कारण अनेक तांत्रिक कारणांनी यापूर्वी ज्या शाळेत विद्यार्थी शिकला त्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस मध्ये नोंद केली असेलच असे नाही. ज्या विद्यार्थ्यांची नोंद यु-डायस प्लस मध्ये झालेली असेल असेच विद्यार्थी दुसऱ्या शाळेत यु-डायस प्लस वरून घेता येतात. 31 जुलैला आता फक्त 10 च दिवस शिल्लक असुन शिक्षकांना याबाबत पुरेशी कल्पना नसून 30 सप्टेंबर हिच शेवटची तारीख आहे असे शिक्षकांना माहिती आहे, त्यामुळे या गोष्टींचा विचार करून आपल्या स्तरावरून लवकरात लवकर योग्य ते आदेश निर्गमित करून शिक्षकांना दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व संचालक श्री महेश पालकर यांना देऊन चर्चा करण्यात आली.
शिक्षण आयुक्तांनी मुख्याध्यापक महासंघाची मागणी तत्वतः मान्य केली आहे तरीही शासन स्तरावरून जो पर्यंत 30 सप्टेंबर बाबत स्पष्ट आदेश निर्गमित होत नाहीत तोपर्यंत शिक्षकांनी 31 जुलै हीच संच मान्यतेची अंतिम राहू शकते ह्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. मनोज पाटील, शिक्षकेत्तर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, आसाराम शेळके, संजय चव्हाण, कैलास चव्हाण ईत्यादी उपस्थित होते.
What's Your Reaction?






