अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 0
अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावा...

अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. 8(डि-24 न्यूज)- शहरात रस्ते विकास, पाणी पुरवठा वितरणाचे सुसूत्रिकरण, सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्यांना मोफत घरे देणे याबाबत महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्यात येईल, त्यासाठी म्हाडा कडुन घरे मिळविण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश श्री. शिंदे यांनी यंत्रणेस दिले 

 शहरातील मोकळे झालेल्या रस्त्याचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच शहराची पाणी पुरवठा व्यवस्था याबाबत सादरीकरण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर करण्यात आले. तसेच दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजना, सांडपाणी प्रक्रिया इ. बाबत आढावा घेण्यात आला.

हॉटेल रामा येथे आयोजित बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट,आ. अर्जुन खोतकर, आ.रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, महावितरण चे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट उपस्थित होते.

रस्ते विकासासाठी 1950 कोटीचा आराखडा

आगामी कुंभामेळाच्या अनुषंगाने नाशिक,त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजी नगर, वेरूळ(घृषणेश्वर मंदिर), शिर्डी, शनि शिंगणापूर या ठिकाणी तीर्थ यात्रा करण्यासाठी भाविक येतील. त्यासाठी शहरातून या सर्व भागाचे दळणवळण अधिक गतिमान व्हावे. तसेच पडेगाव रस्ता, पैठण रस्ता, बीड बायपास, जालना रस्ता, जळगाव रस्ता, सिडको ते बीड बायपास हे रस्ते तसेच महावीर चौक फ्लाय ओव्हर ब्रीज, अमप्रीत हॉटेल जवळ अंडरपास अशा 44.5 किमी रस्त्याचा या रस्ते विकास प्रकल्पात समावेश आहे. या एकूण प्रकल्पात 12 फ्लायओव्हर होणार आहेत, अशी माहिती सादरीकरणात देण्यात आली.

रस्ते विकासासाठी 1950 कोटी रुपयांचा निधी लागणार असून सन 2025-26 मध्ये 390 कोटी, सन 2026-27 मध्ये 1170 कोटी रुपये, सन 2027-28२० मध्ये 390 कोटी रुपये असा तीन टप्प्यात हा निधी खर्च होईल.

मार्च 2026 पर्यंत दररोज पाणी पुरवठा...

शहरात येत्या मार्च 2026 अखेर दररोज पाणी पुरवठा करता यावा यासाठी उपाय योजना सुरु आहेत. पहिला 26 एम एल डी चा टप्पा कार्यान्वित झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 200 एम एल डी पुरवठा नोव्हेबर अखेर सुरु होईल. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होईल. तर मार्च अखेर दररोज पाणी पुरवठा शक्य होईल, असे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आणण्यासाठी 822 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या लोकांना मोफत घरे

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या लोकांना मोफत घरे देण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. 150 घरे म्हाडा कडुन मिळणार असून त्यासाठी 24 कोटी रुपये निधी लागणार आहे. तसेच विविध आवास योजना मधूनही नागरिकांना घरे उपलब्ध करून द्यावीत. तसेच उद्योग वाढीमुळे येणाऱ्या कामगार, कर्मचारी वर्गाला परवडतील अशा घराच्या निर्मितीचा प्रकल्प राबवावा, अशी सुचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

सांडपाणी प्रक्रिया योजना ही पूर्णत्वाकडे...

सांडपाणी प्रक्रियेसाठी 830 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत असून ती 75 टक्के पूर्णत्वास आली आहे. जून पर्यंत ही योजना पुर्ण होईल, असे जी.श्रीकांत यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिकेने स्वतः च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवायला हवे. सांडपाणी प्रक्रियेत शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनः वापर करण्याबाबत एमआयडीसीशी करार करावा. शहरातील रहदारी अडथळे विरहित व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प राबवा. विकास आराखड्या नुसार रस्ते विकास करा. अतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या कुटुंबंना घरे द्या, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.

तसेच अतिवृष्टी मुळे नुकसान ग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा व शेतकऱ्यांना मदत करा. जालना नांदेड रस्त्याच्या भू संपादन प्रक्रियेत मूल्यांकन फरकाची शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याची तपासणी करा, असे ही निर्देश त्यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow