गरीबांच्या मालमत्तांवर हातोडा, श्रीमंतांना मुदत, रेल्वेस्टेशन अतिक्रमण कार्यवाई

गरिबांच्या मालमत्तांवर हातोडा...श्रीमंतांना मुदत, रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप 119 अतिक्रमणे काढली...
महापौर बंगला, माजी खासदाराच्या बंगल्याला अभय दिल्याचा आरोप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) आज सकाळी 10 वाजेपासून रेल्वेस्टेशन गेट समोरुन दिवंगत जेष्ठ पत्रकार बासित मोहसीन यांच्या घरापासून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली त्यानंतर जनता हाॅटेलची तीन मजली इमारत भुईसपाट केली. मालकाने नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांना कागदपत्रे दाखवली तरीही न जुमानता अतिक्रमण पाडण्यात आली. रेल्वेस्टेशन जामा मस्जिदच्या भींतीलगत टिन शेडमध्ये असलेले दुकाने काढण्यात आली. मस्जिद कमेटीने सहकार्य केल्याने मनपा प्रशासनाने आभार मानले. डाव्या बाजूने असलेले खानावळाचे एका लाईनीत असलेल्या तीन ते चार हाॅटेलचे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी बंदोबस्तात छावणीचे स्वरुप दिसून आले. शांतपणे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु होती. महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत गरिबांच्या घरांवरच हातोडा मारण्यात येत आहे तर श्रीमंतांच्या बंगल्यांना मात्र मुदत दिली जात आहे. गरिबांनाही 15 ऑगस्टपर्यंत मुदत का देत नाही, माजी खासदाराच्या बंगल्यासमोर जेसीबी लावले होते ना, का हलविले मग तिथून, का नाही पाडले बाधित बांधकाम, असा संतप्त सवाल पदमपुरा येथील नागरिकांनी केला. महापौर बंगल्याला पण अभय देण्यात आले. गरिबांवरच अन्याय केला जात आहे, आधी बंगल्यावाल्यांचे तोडा, नंतर पुढे तोडा... अशी मागणीही यावेळी केली. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप दरम्यान रस्त्यावर कारवाई करण्यात आली.
पदमपुरा येथे मार्किंग केल्यानंतर अनेक बंगल्यांच्या संरक्षक भिंतीवर हातोडा पडणार असल्याचे दिसून आले. मात्र यावेळी काही बंगल्यांसमोर जेसीबीसह पथक उभे राहिले, मात्र कारवाई केली नाही, तिथून माघारी फिरल्याने काही नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला. या भागात एका बंगल्यात कच्चे बांधकाम करून व्यावसायिक वापर सुरू होता, पथकाने त्यावर हातोडा मारला. या बंगल्याच्या मालकाने माजी खासदाराच्या बंगल्याकडे बोट दाखवित ते का नाही पाडले, असा प्रश्न पथकातील अधिकाऱ्यांना केला. तसेच काही नागरिकांनी पथकावर कारवाईत दुजाभाव केल्या जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर अतिक्रमण विभाग प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी प्रत्यक्ष जावून बंगल्याची पाहणी केली.
यावेळी बोलताना नियंत्रण अधिकारी वाहुळे यांनी सांगितले की, मार्किंगनुसार या बंगल्याची संरक्षक भिंत आणि सुरक्षारक्षकाचे केबिन बाधित होत असल्याचे दिसून आले. मात्र तो निवासी प्लॉट आहे, त्यावर बांधकामाची पूर्ण परवानगी आमच्याकडून घेतलेली आहे. निवासी मालमत्ताधारकांना न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे, त्यामुळे त्यांनाही बाधित बांधकाम स्वत:हून काढून घेण्याची सूचना केली. व्यावसायिक मालमत्ताधारकांना आम्ही अशी कोणतीही सूट दिलेली नाही,
पदमपुरा मालमत्ताधारकांचा आक्षेप...
आधी मोबदला द्या, नंतर पाडा...
आमचा गावठाणमधील परिसर आहे. मनपा येण्याआधीपासून आम्ही पदमपुऱ्यात राहत आहोत. आमचे घर अतिक्रमणात नाही. पीआर कार्ड, टॅक्स सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत. दुभाजकापासून साडे सतरा मीटर मोजत आहे, मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला छावणी परिषदेची जागा आहे, ती घेत नाहीत. त्यामुळे माझे सर्व घर चालले आहे. मनपा म्हणते बांधकाम अधिकृत करून घ्या, मात्र गावठाणातील बांधकामाचे गुंठेवारी होत नाही. मला भूसंपादन कायद्यानुसार आधी मोबदला, त्यानंतरच त्यांनी माझे घर पाडावे, अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली.
रस्ता नेमका किती मिटरचा...नागरीकांमध्ये संभ्रमावस्था...?
रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप चौक रस्त्यालगतच्या नागरिकांमध्ये संभ्रम...
अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मनपा प्रशासनाने बुधवारी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोल पंप (महावीर चौक) पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या बांधकामांवर हातोडा मारला. यावेळी हा रस्ता नेमका किती मीटरचा आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. जुन्या विकास आराखड्यानुसार हा रस्ता 30 मीटरचा तर नवीन विकास आराखड्यात 35 मीटरचा दाखविण्यात आला आहे. मार्किंग करताना दुसऱ्या बाजूला असलेल्या छावणी परिषदेची जागाही घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली. तर ती जागाही घेण्यात येणार असल्याचे सांगत अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वी दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावर कारवाई करतानाही रस्त्यांची नेमकी रुंदी किती, यावर प्रश्न उपस्थित झाला होता. 30 मीटरचा रस्ता असताना 35 मीटरवर मार्किंग केल्याचा आरोप झाला होता. हाच प्रकार बुधवारी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप या रस्त्यावर मार्किंग करताना झाला. त्यामुळे महापालिकेकडून रितसर बांधकाम परवानगी घेऊन केलेली बांधकामे देखील सहा ते सात फुट तोडावी लागणार आहेत.
जुन्या विकास आराखड्यानुसार हा रस्ता 30 मीटर रुंदीचा होता. तर नवीन विकास आराखड्यानुसार हा रस्ता आता 35 मीटर रुंद करण्यात आला आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अडीच-अडीच मीटरने रस्त्याची रुंदी वाढवावी लागत आहे, त्यामुळे या जागेत बाधित होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तर बांधकाम परवानगी असलेल्या मालमत्ताधारकांना 15 ऑगस्टपर्यंत स्वत:हून बाधित बांधकाम काढून घेण्याची सूचना करण्यात आली.
रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान 119 बांधकामे निष्कासित...
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 119 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, कमान, जाहिरात फलक,इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहा पोलिस आयुक्त संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे,
सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.
What's Your Reaction?






