जिल्हाभरात उद्या एकाचवेळी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा...
जिल्हाभरात उद्या एकाचवेळी “आरोग्य समुपदेशन कार्यशाळा”
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यापक उपक्रम
उशीर्षक :
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती
शिक्षण विभागाच्या नियोजनातून आरोग्य–शिक्षण विभागाचा संयुक्त उपक्रम
“आरोग्य धनसंपदा” टॅगलाईनखाली दशसूत्री अंतर्गत आयोजन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने “आरोग्य समुपदेशन कार्यशाळा” उद्या बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम दशसूत्री कार्यक्रमांतर्गत “आरोग्य क्षम विद्यार्थी घडविणे” या मुख्य हेतूने राबविण्यात येत असून “आरोग्य धनसंपदा” या टॅगलाईनखाली ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक व तांत्रिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये असंतुलित आहार, स्क्रीन टाईमचा अतिरेक, मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य तसेच जीवनशैलीशी संबंधित विविध आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. किशोरवयीन वयात होणारे शारीरिक बदल आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक व भावनिक अस्थिरता लक्षात घेता, विद्यार्थ्यांना योग्य वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व समुपदेशन मिळणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ही एकदिवसीय आरोग्य समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर, समुपदेशक, आरोग्य विषयक सल्लागार तज्ज्ञ तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, स्क्रीन टाईमचे नियमन, मोबाईल व सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, व्यसनमुक्ती, किशोरवयीन आरोग्य समस्या, मानसिक ताणतणाव व भावनिक बदल अशा विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून थेट उत्तरे देणे तसेच वैयक्तिक आणि गट समुपदेशनाचाही समावेश या कार्यशाळेत करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी महसूल विभाग, शिक्षण विभाग व जिल्हा परिषद यामधील सर्व अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये जिल्हाधिकारी महोदय हे इंग्रजी होली क्रॉस शाळा, छावणी येथे, तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर हे सरस्वती भुवन प्रशाला, औरंगपुरा येथे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल व आरोग्य विभागातील अधिकारी विविध शाळांना भेट देऊन कार्यशाळेचे निरीक्षण करणार असून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भेट देणारे अधिकारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तसेच समुपदेशन करणारे डॉक्टर यांना गुगल लिंकद्वारे कार्यशाळेसंदर्भातील आवश्यक माहिती भरावी लागणार असून त्याद्वारे कार्यशाळेचे मूल्यमापन व अहवाल संकलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एक पूर्ण तास आरोग्य क्षम विद्यार्थी घडविण्यासाठी द्यावा, असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी केले असून या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शाळांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत पार पाडण्यात येत आहे.
ही आरोग्य समुपदेशन कार्यशाळा केवळ एक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारी, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेणारी आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करणारी ठरणार आहे. शाळा, पालक आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
What's Your Reaction?