जिल्हा रुग्णालयात दहावा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा...

जिल्हा रुग्णालयात दहावा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा–
नाविन्यपूर्ण उपक्रम ‘सॅटॅलाइट आयुष दवाखान्यां’ची लवकरच सुरुवात --
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) - आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि वैज्ञानिक वैद्यकीय परंपरा आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगण्याचा संदेश देणाऱ्या या शास्त्राच्या जागतिक प्रसारासाठी दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यावर्षी दहावा आयुर्वेद दिन छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर होते. या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, बालरोगतज्ज्ञ वर्ग-१ डॉ. भरती नागरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील अहमद, मॅटरन श्रीमती शुभांगी थोरात तसेच डॉ. सफिना खान यांचे प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती तेजस्वीनी तुपसागर यांनी केली. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत धनतेरसऐवजी २३ सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिन साजरा करण्यामागील महत्त्व अधोरेखित केले. “२३ सप्टेंबर हा दिवस व रात्र समान असण्याचा दिवस आहे. समतोल आणि संतुलन आयुर्वेदाची मूळ संकल्पना आहे. या दिवसाचे प्रतीकात्मक महत्त्व लक्षात घेऊनच हा दिन राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून निवडण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आयुष सेवा याची माहिती या कार्यक्रमात सविस्तर देण्यात आली. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील अहमद यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून “जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये सॅटॅलाइट आयुष दवाखाने सुरू करण्याची तयारी सुरू असून, येत्या काही दिवसांत हे दवाखाने सुरू होतील. या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आयुष सेवेचा अधिक व्यापक लाभ मिळणार आहे.” त्यांनी जनतेला या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.
यावेळी डॉ. रवींद्र बोर्डे यांनी आयुर्वेद दिनानिमित्त माननीय पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला. संदेशातून आयुर्वेदाच्या वैज्ञानिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक - आयुष, डॉ अनिसा पठाण, सहाय्यक मॅटरन श्रीमती कोमल धोत्रे व श्रीमती शारदा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
डॉ. अनिसा पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आयुर्वेद दिनाचा हा कार्यक्रम केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता, आयुर्वेदाचा व्यापक प्रसार, आधुनिक आरोग्य व्यवस्थेसोबत त्याचे एकत्रीकरण, तसेच निसर्गाशी समतोल साधून आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा संदेश देणारा ठरला. जिल्हा रुग्णालयातून दिलेला हा उपक्रम निश्चितच लोकांच्या आरोग्य जाणीवेत सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






