धक्कातंत्राचे बादशहा...! अनेक पत्रकार घडवणारे व्यक्तीमत्व म्हणजे पुरी सर... यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
धक्कातंत्राचे बादशाह ! प्राध्यापक सुरेश पुरी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख....अनेक पत्रकार घडवणारा अवलिया व्यक्तीमत्व म्हणजे पुरी सर....
सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश पुरी (सर) आणि विजयमाला पुरी (काकू) यांचा आज वाढदिवस. सरांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं. तर काकू येत्या दोन-तीन वर्षात पंच्याहत्तरी गाठतील. दोघेही अनेक विद्यार्थ्यांचे दैवत. जणू काही विठ्ठल रखूमाईच.
मुटाचे (मराठवाडा विद्यापीठ शिक्षक संघटना) पहिले सरचिटणीस, विमुक्त भटक्या जमातीला प्रबोधन करणाऱ्या 'विमुक्तजन' त्रैमासिकाचे संपादक, विद्यापीठ नामांतर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, मराठवाड्यातील पहिल्या सामाजिक कार्य महाविद्यालयाचे संस्थापक, जनसंपर्क विषयावरील मराठीतले पहिले व तत्काळात एकमेव पुस्तक असलेल्या ‘जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धांत’ ग्रंथाचे लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंपर्क विभागाचे प्रपाठक तथा माजी विभाग प्रमुख, लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयाचे आश्रयदाते, देशाच्या अनेक महत्त्वाच्या शासकीय हुद्यावर, माध्यम क्षेत्र, हिंदी, समाज कार्य सेवेत सेवा बजावणाऱ्यांचे व सेवानिवृत्तांचे मार्गदर्शक, गरजवंत, होतकरू विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ अशा एकनानेक बिरूदावल्यादेखील कमी पडतील, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त प्राध्यापक व विद्यमान राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी सर.
काकू सरांचा भक्कम पाठिंबा. काकू धार्मिक वृत्तीच्या. मात्र, सर इथं कानाडोळा करतात. सत्कर्मावर दोघेही विश्वास ठेवतात. सत्कर्म करून इतरांनाही ते प्रेरित करतात. दोघेही एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी असतात. सरांचा स्वभाव मदत करण्याचा. तर काकूंचा त्या मदतीला अधिक भरीव करण्याचा. कोणताही व्यक्ती असो, सरांच्या घरातील आदरातिथ्याशिवाय बाहेर पडत नाही. या अन्नपूर्णेचा हात कधीच खंडित पडलेला नाही. अतिथी देवो भव याची प्रचिती इथे येतेच.
सणावाराला तर काकूंचा उत्साह शिगेला पोहोचलेला असायचा. आम्ही हॉस्टेलला राहणारे दहा-बारा विद्यार्थी, प्रत्येक सणाला सरांच्या घरी जेवत. जेवणही अप्रतिमच. आजही त्या जेवणाची रूचकरता अधिक मनाला भावते. त्या गोडधोड जेवणाची तुलना कशाशीही होत नाही. या माऊलीने अनेक दु:ख झेलून सरांच्या सत्कार्यात नेहमीच मोलाचा वाटा उचललाय.
तर सेवानिवृत्तीनंतर न थकता अनेक सामाजिक कार्याबरोबरच, हिंदी भाषेच्या सेवेसाठी सरांनी विद्यार्थी दशेपासून तहहयात स्वत:ला वाहून घेतले. त्याचबरोबर आजही फेसबुकवरील प्रत्येकाच्या पोस्ट, कॉमेंटवर ते दररोज व्यक्त होतात. सुखदु:खात सहभागी होतात. ख्याली खुशालींची विचारपूस करतात. यासह त्यांचे नवनवीन तंत्र अशात अनुभवयास मिळत आहेत. त्यातील पहिले तंत्र म्हणजे धक्कातंत्र.
*प्रसंग पहिला*
त्याचे असे झाले, की ! 11 फेब्रुवारी माझा वाढदिवस. या दिवशी शासकीय सुटी होती. म्हणून घरीच होतो. सर, काकू आणि सरांच्या कन्या डॉ. मनिषा ताई दुपारी अचानक माझ्या घरी आले. मला आश्चर्याचा सुखद धक्का त्यांनी दिला. सोबत लातूरचे ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे सर होते. त्यांनीही मला पूर्वकल्पना दिली नव्हती. तसं त्यांनाही धक्काच होता. सर, काकू, ताई, अडसुळे सर आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु सर अचानकपणे आले. म्हणून मी मनातल्या मनात विचार करत होतो. सरांनी मला ते येणार असल्याचे का सांगितले नाही, बरं ? तेवढ्यात चाकुरहून पत्रकार मित्र संग्राम वाघमारे यांचा फोन आला. त्यांच्यासह पत्रकार मित्र विकास स्वामी, दत्तात्रय बेंबडे, संजय पाटील सोबत होते. ते घराजवळ आले होते. ते घरी आले. त्यांच्यासमक्ष सरांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना म्हटले, ‘जी शाल मी तुला देत आहे, तिला माझ्या आयुष्यात मोलाचं स्थान आहे, त्यामुळे ती जपून ठेव.’ नंतर त्यांनी त्या ‘शाले’बाबत सांगितले. एका गुरूकडून विद्यार्थ्याप्रती असलेली ही निखळ, निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक माझ्या कुटुंबियांनी, मित्रांनी अनुभवले. वाढदिवसाच्या दिवशी एक छोटाखानी कार्यक्रमच अनपेक्षितरित्या घरात पार पडला. यामुळे खरच मी व कुटुंबीय धन्य झालो.
प्रसंग दुसरा
ईद होती. त्यामुळे सुटी होती. वारा, पाऊस सुरूच होता. त्यामुळे वीज नव्हती. सायंकाळचे पाच-सहा वाजले असतील. अंधार पडला होता. गॅलरीत मी लेकरांना घेऊन उभा होतो. थेट चारचाकी गाडी गॅलरीसमोर आली. मी विचारात पडलो. इतक्या वेगात, तेही थेट गॅलरीजवळ गाडी…क्षणभर सुचेनासे झाले. गाडीच्या आतील बाजूचे दिसत नव्हते. गाडीतूनही कुणी बाहेर पडत नव्हते. थोड्या वेळात सरांसारखी व्यक्ती गाडीत बसलेली दिसू लागली. विश्वासच बसेना. निरखून पाहिलं. सर दिसले. गालातल्या गालात ते हसले. पुन्हा तोच धक्का. सोबत काकू, ताई आणि अडसुळे सर. यावेळी मात्र त्यांनी सोबत लेकरांना ड्रेस आणले होते. शायरा, शामिराने ते घातले. सर, काकू, ताईजवळ शायरा, शामिरा बसल्या. बोबडे बोल बोलून त्यांनी लेकरांचं कौतुक केलं. मलाही खूप आनंद झाला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला, तो अडसुळे सरांनी. शिवाय हा आनंदाचा क्षण त्यांनी इतरांसोबतही शेअर केला. त्यामुळे सरांच्या आगमनाच्या धक्कातंत्राचा फटका त्यांनाही बसला. पण असे धक्के सर वारंवार आपल्या शिष्योत्तमांना नेहमीच देतात, त्याचा मला अभिमानच वाटतो, अन् मनोमन वाटतं, सर अशा अनपेक्षित आनंद देण्याच्या धक्कातंत्राचे बादशाह आहेत. खरच सर, काकू व एकूणच संपूर्ण पुरी कुटुंब उदार अंत:करणाचे आहे. सरांना व काकूंना आजच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
-डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्या
लय, लातूर
What's Your Reaction?