महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बनले देशाचे उपराष्ट्रपती...

एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा ऐतिहासिक विजय
नवी दिल्ली, दि.9(डि-24 न्यूज) -
एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी आज झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केला. या निवडणुकीत विरोधक खासदारांची तब्बल 29 मते फुटली असून, त्यापैकी 15 मतपत्रिका बाद झाल्या आहेत. विशेष म्हणजे विरोधक पक्षातील तब्बल 14 खासदारांनी थेट एनडीए आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करून त्यांच्या विजयाला अधिक बळकटी दिली.
या विजयामध्ये महाराष्ट्र आणि गोवा येथील खासदारांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल. या प्रदेशातील खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्रजी यादव यांना मुख्य संयोजक म्हणून, तर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांना सहसंयोजक म्हणून सोपविण्यात आली होती. मतदानापूर्वी केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्रजी यादव यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोवा येथील सर्व खासदारांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व खासदारांनी एकत्रितपणे भूमिका निश्चित करून एनडीए आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान केले.
श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा हा विजय विरोधकांसाठी मोठा पराभव मानला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे दृढ राजकीय संघटन, धोरणात्मक रणनीती आणि राष्ट्रीय पातळीवरील व्यापक स्वीकार याचे द्योतक ठरला आहे.
What's Your Reaction?






