मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा यात्रेवर आमदार अंबादास दानवे यांची टिका, दहावीच्या विद्यार्थ्यांची यादी सोशल मीडियावर...

 0
मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा यात्रेवर आमदार अंबादास दानवे यांची टिका, दहावीच्या विद्यार्थ्यांची यादी सोशल मीडियावर...

मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा यात्रेवरून भाजप-शिवसेनेत राजकीय संघर्ष; विद्यार्थ्यांना सक्तीने सहभागी केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर, दि.14(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा यात्रे’वरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या यात्रेसाठी मोठी गर्दी जमविण्याची तयारी भाजपकडून करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.

दानवे यांनी सोशल मीडियावर एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची यादी आणि मोबाईल क्रमांक असल्याचे सांगत हा पुरावा प्रशासनासमोर मांडला. दहावीच्या विद्यार्थ्यांना तिरंगा यात्रेसाठी उपस्थित राहण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर...

अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांना राजकीय कार्यक्रमासाठी वापरले जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “विद्यार्थ्यांचे करिअर आणि त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे. राजकीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची गर्दी जमविणे योग्य आहे का...?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तिरंगा यात्रा हा राज्य सरकारचा कार्यक्रम नसून भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. प्रशासन आणि शिक्षकांवर दबाव आणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांच्या भवितव्यापेक्षा राजकीय गर्दी महत्त्वाची आहे का...?” असा सवाल उपस्थित करत दानवे यांनी या प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच या दाव्यांची वस्तुस्थिती स्पष्ट होणा

र आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow