लोकशाहिमुळे मिळालेल्या अधिकार आणि कर्तव्यांबाबत यूवकांनी जागरुक असावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
107-औरंगाबाद(मध्य) विधानसभा स्वीप उपक्रम
लोकशाहीमुळे मिळालेल्या अधिकार आणि कर्तव्यांबाबत
युवकांनी जागरुक असावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) आपल्या आयुष्यात व सामाजिक जीवनात मिळणाऱ्या विविध सोई, सुविधा आपले शिक्षण, रोजगार यासारख्या बाबी प्राप्त करण्यात तसेच आपल्याला मिळालेले अधिकार आणि कर्तव्य हे सगळे लोकशाहीमुळे मिळालेले असून त्यासंदर्भात युवकांनी जागरुक असावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
विधानसभेच्या 107-औरंगाबाद (मध्य) मतदारसंघांतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. प्रभा खैरे, डॉ. विनोद मुंदडा, आयएमएच्या डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. श्रीनिवास गडाफ, डॉ. सुरेश सारवडे, स्वीप अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थी जिवनात विद्यार्जन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्याच प्रमाणे आपल्या जीवनासाठी आपल्या समाजासाठी लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करणे हे सुद्धा आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवकांनी जागरुक असायला हवे. विद्यार्थी दशेत असतांना विद्यार्थ्यंनी आपल्या भवतालच्या सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षरोपण अशा विविध विषयांत विद्यार्थ्यांनी कार्यरत असणे आवश्यक आहे. आपल्या आई वडील, गुरुजनांचा आदर करणे, सुसंस्कारित होणे यासारख्या बाबी ह्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असतात. या संस्कारांपासून दुर जाणाऱ्या पिढीला संस्कारक्षम बनवून देश, राज्य आणि समाजाभिमुख युवक घडविणे हे आजच्या शिक्षक आणि पालकांचे उद्दिष्ट असायला हवे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अर्चना दरे यांनी केले.
What's Your Reaction?