विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील एसआयआर कामाचा घेतला आढावा

 0
विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील एसआयआर कामाचा घेतला आढावा

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसआयआर कामाचा घेतला आढावा...

मतदार यादी अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 21 (डि-24 न्यूज)- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त तयार करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, अति. आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, रणजीत पाटील, सह आयुक्त (सामान्य प्रशासन), मंजुषा मिसकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसिलदार के. के. भदाने यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळणे, गणना फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढणे आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

श्री. श्रीकांत म्हणाले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे. अपात्र नोंदी नियमानुसार व वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर प्रभावी समन्वय राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत, तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश देण्यात आले.

यावेळी मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. 

यावेळी एसआयआर सबंधित कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow