विशेष निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
 
                                विशेष निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) ‘लोकसभा निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार व एन.के. मिश्रा यांनी आज जिल्हा प्रशासनाचा निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
आज सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कायदा सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, मतदान केंद्र व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, मतदान यंत्र व त्यांची सुरक्षा व्यवस्था , मतमोजणी पूर्वतयारी इ. विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
श्री. गंगवार यांनी सर्व निवडणूक यंत्रणेतील विविध विभागांचा एक संयुक्त कृतीदल तयार करावे असे निर्देश दिले. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने उपद्रवी व्यक्तिंच्या हालचालीवर नजर ठेवणे, त्याबाबत गुप्त माहिती मिळविण्यासाठी संपर्क जाळे तयार करणे याबाबतच्या उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या. याशिवाय पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘सायबर पेट्रोलिंग’ बाबतही माहिती जाणून घेतली.
जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली. मतदान केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या सुविधा, माध्यमांना माहिती देण्यासाठी संवाद सेतू, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाचे मॉनिटरींग, मतदान यंत्रांची सुरक्षा व्यवस्था व चाचण्या , मिडीया कक्ष इ. बाबत माहिती देण्यात आली.
श्री, एन.के, मिश्रा यांनी कायदा व सुव्यवस्थे संदर्भात आढावा घेतांना सांगितले की, प्रशिक्षित मनुष्यबळाद्वारे संचलित एक संयुक्त नियंत्रण कक्ष असावा. जादा मतदान केंद्र जर एकाच इमारतीत असतील तर तेथे थेट मतदान खोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गिका इमारतीच्या प्रवेशद्वारापासून तयार कराव्या, जेणे करुन मतदारांना फिरावे लागणार नाही, गावपातळीवर मतदान जनजागृती करावी, वाहनांची तपासणीइ. बाबत त्यांनी सुचना दिल्या.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            