आठवडी बाजार बंद करण्यास सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोध...

 0
आठवडी बाजार बंद करण्यास सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोध...

आठवडी बाजार बंद करण्यास सत्ताधारी नगरसेवकांचाही विरोध...

आठवडी बाजार विकसित करा किंवा पर्याय द्या, नगरसेवकांची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेत शनिवारी अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील साप्ताहिक बाजार बंद करण्याचा मुद्दा गाजला. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही साप्ताहिक बाजार बंद करण्यास विरोध दर्शवला. बाजार बंद करण्याऐवजी त्यांचे आधुनिकीकरण करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. पार्किंग, शुद्ध पिण्याचे पाणी, शेड, ओटे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, असे नगरसेवकांनी सांगितले. केवळ बंद करण्याची घोषणा न करता पर्यायी व्यवस्था स्पष्ट करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

स्थायी समितीच्या बैठकीस सभापती अनिल मकरिये, सचिव एन. भोंबे, भाजप, एमआयएम, दोन्ही शिवसेना पक्षांचे प्रतिनिधी तसेच अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी सदस्य राज वानखेडे यांनी मनपाच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत साप्ताहिक बाजारांचा विषय उपस्थित केला. बाजार बंद केल्यास प्रशासनाकडे पर्याय काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकार ‘लोकल टू व्होकल’चा नारा देत असताना शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी साप्ताहिक बाजार उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजार बंद करण्याऐवजी त्यांचे आधुनिकीकरण करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांसाठी सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महिला सदस्या माधुरी अदवंत यांनीही प्रशासनाचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. शहरातील ऐतिहासिक साप्ताहिक बाजारांना स्वतःची ओळख असल्याचे नमूद करत, वाहतुकीच्या अडचणींच्या कारणावरून बाजार बंद करण्याऐवजी त्यांना मॉलच्या धर्तीवर विकसित करावे, असे त्यांनी सुचवले. उबाठा सदस्य सचिन खैरे, एमआयएमचे मतीन पटेल आणि इतर सदस्यांनीही साप्ताहिक बाजार बंद करण्यास विरोध नोंदवला. शहरातील जाफर गेट, चिकलठाणा आणि पीर बाजार हे प्रमुख साप्ताहिक बाजार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

साप्ताहिक बाजार दुरुस्त केले जातील : प्रशासन

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आयुक्त श्रीकांत यांनी साप्ताहिक बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या बाजारांमध्ये सुधारणा करून समस्या दूर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे साप्ताहिक बाजार बंद करण्याचा निर्णय सध्या तरी स्थगित ठेवण्यात आला आहे.

आज सकाळी 11 वाजता महापालिकेत स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सदस्यांनी अर्थसंकल्पात वाढ करावी. शहरातील आठवडी बाजार बंद होणार नाही हा निर्णय मागे घ्यावा व विविध विषयावर अक्रामक चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 2026-27 आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीत कचरा, नाले, कचरा, अतिक्रमण, हाॅकर्स झोन, पे एण्ड पार्क, नगरसेवकांना विकास कामे करण्यासाठी वाढीव व समान निधी मिळावा व इतर विषय गाजले. प्रत्येक सदस्याने भरीव निधीचे साकडे सभापती अनिल मकरिये यांना घातले.

महापालिकेचे आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्त जी. श्रीकांत यांनी 25 मार्चला सादर केले. यामध्ये 3 हजार 224 कोटी 37 लाख 68 हजार रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी स्वीकारला होता. त्यावर आज सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सदस्यांनी विविध प्रश्‍न उपस्थितीत केले. त्यात भाजपाच्या कमल नरोटे यांनी अंबिकानगर भागातील नाला स्वच्छ करण्याची मागणी केली. या नाल्यात कचरा टाकला जातो, त्यामुळे श्‍वान येतात, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी आदी मुद्दे मांडले. ॲड. माधुरी अदवंत यांनी आझाद चौक ते सावरकर चौकापर्यंत बांधकाम साहित्याची वाहने थांबतात हा रस्ता महानगरपालिकेने करारावर दिला आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला. अप्पासाहेब हिवाळे यांनी सातारा-देवळाई परिसरातील खुल्या जागांचा विकास करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी हवा, तसेच सातारा-देवळाई भागासाठी किमान 150 कोटी रुपयांची या अर्थसंकल्पात तरतूद करावी. या भागात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला. नागरिक कर भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे मोफत टॅंकर देण्यासाठी तरतूद करावी, बीड बायपासवर वाहतूक सिग्नल बसविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. श्‍वेता त्रिवेदी यांनी स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्याची मागणी केली.

रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने चिकलठाण्यात अतिक्रमण पाडले. ज्यांची हक्काची मालमत्ता पाडली अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही. मावेजा देण्याची मागणी रवी कावडे यांनी केली. केवळ 50 ते 60 जणांना मावेजा देण्याची आवश्‍यकता आहे, त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी कावडे यांनी केली.

एमआयएमचे नगरसेवक अजहर पठाण यांनी शहरात हाॅकर्स झोन लवकर बनवावे, शहराला लागून असलेल्या प्रभागातील नगरसेवकांना विकास नीधी वाढवून द्यावा व सर्व नगरसेवकांना स्वेच्छा नीधी 15 लाख अर्थसंकल्पात तरतूद करावी. दिव्यांगांच्या बजेट 21 कोटी वरुन 42 कोटी करुन गरजू पर्यंत लाभ पोहचवण्यासाठी नियोजन करावे. ड्रेनिज स्वच्छ करण्यासाठी जेटींग मशिनची संख्या वाढवावी. रस्त्यावर पार्कींग होणार नाही यासाठी पे एण्ड पार्क व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्याकडे केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow