जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी "कन्या सन्मान दिवस" साजरा करणार...

जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करणार;
गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याविषयी होणार जनजागृती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) – गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.14 ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 84 महसूल मंडळ मुख्यालयी या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल अधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत निर्देश दिले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुदखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बढे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी आदी मुख्यालयातून सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण समाधानकारक नसल्याने मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. हे चिंताजनक वास्तव लक्षात घेऊन, समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व्यापक पातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्यासाठी गुरुवार दि.14 रोजी सकाळी 9 वा. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ मुख्यालयी जनजागृतीपर कार्यक्रम होईल. त्यात शाळेतील विद्यार्थिनींचा सन्मान, माता-पालक संवाद, विविध वक्त्यांचे मार्गदर्शन, तसेच कायदेशीर माहितीचा प्रसार. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाची प्रभावी प्रसिद्धी. विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच स्थानिक महिला, विद्यार्थी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असेल. महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी, पोलीस विभाग, ग्रामविकास विभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन करतील,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






