दिलेल्या परवानगी प्रमाणे बांधकामे पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी आता वास्तू विशारदाची

 0
दिलेल्या परवानगी प्रमाणे बांधकामे पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी आता वास्तू विशारदाची

दिलेल्या परवानगीप्रमाणे बांधकामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता वास्तू विशारदांची

  

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) शहरात बहुतांश गृहप्रकल्प व घरांची बांधकामे ही विकासकांकडून दिलेल्या परवानगीप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र आता बांधकामे दिलेल्या परवानगीनुसार करून घेण्याची जबाबदारी वास्तू विशारद यांचे कडे सोपवली जाणार आहे. यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरूवारी दि.24 ऑगस्ट रोजी स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयोजित बैठकीत नगररचना विभागाला दिले. यासाठी लवकरच शहरातील 

वास्तूविशारद यांची बैठक बोलावली जाणार आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरूवारी सकाळी अकरा ते एक वाजेदरम्यान नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रासंदर्भातील धोरणावर चर्चा झाली. शहरात होणार्‍या घर व इमारतींच्या बांधकामांपैकी काही बांधकामे ही दिलेल्या बांधकाम परवानगीप्रमाणे केली जात नाही. काही अतिरिक्त बांधकामे केलेली असतात. तर बहुतांश इमारतींच्या बांधकामात पार्किंगचा वापर इतर कामांसाठी केलेला दिसून येतो. बर्‍याचदा वास्तूविशारद यांनी दिलेल्या नकाशाप्रमाणे घर मालक किंवा गृहप्रकल्प विकासक बांधकाम करत नाही. प्रत्यक्ष बांधकामात बरेच बदल केलेले असतात. विशेषतः पार्किंग, बांधकामाच्या बाजूने सोडाव्या लागणार्‍या ओपन स्पेसवर बांधकाम केले जाते. एकदा बांधकामाचा नकाशा करून दिल्यानंतर वास्तूविशारद देखील त्याप्रमाणे बांधकाम झाले की नाही, याची खात्री न करताच भोगवटा प्रमाणपत्रासाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल करतात. 

यामुळेच शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे आता दिलेल्या परवानगीप्रमाणे बांधकामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही पूर्णतः संबंधित प्रस्ताव दाखल करणारे वास्तूविशारद यांचे कडेच सोपवण्यात यावी, असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगररचना विभागाला या बैठकीत दिले. यावर चर्चा करून धोरणात्क निर्णय घेण्यासाठी वास्तूविशारद असोसिएशन व वास्तूविशारद यांची बैठक बोलवावी, असेही प्रशासकांनी सूचित केले. या बैठकीला डीपी युनिटप्रमुख रजा खान, सहायक संचालक नगररचना मनोज गर्जे, उपअभियंता संजय कोंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow