निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या- विभागीय आयुक्त दिलीप गावडे
 
                                निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे...
जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनरचे प्रशिक्षण...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 30(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकांचा कालावधी नजीक आहे, त्यामुळे मिळणारा कालावधी कमी आहे. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसेच नोडल अधिकारी यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गावडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, छत्रपती संभाजीनगरचे(औरंगाबाद) उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह जालना, बीड, धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, निवडणूक आयोगाचे लक्ष या निवडणुकांवर अधिक असणार आहे. त्यामुळे काटेकोरपणे सर्व जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनरचे तसेच विविध नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचे ओळख करून घ्यावी व कामकाज परिपूर्ण असावे याची खबरदारी घ्यावी. निवडणूक कामकाज सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे व त्याचे पालन व्हावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या.
सोशल मीडियावर येणाऱ्या फेक स्वरूपाच्या बातम्या तसेच या निवडणुकीत सर्वच शहरी भागातून सर्व मतदार केंद्रांवरून इंटरनेटद्वारे होणारे वेबकास्ट निवडणूक विभाग पाहणार आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर सर्वतोपरी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असेही श्री गावडे म्हणाले.
उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी प्रारंभी आयोजनाबाबत व या प्रशिक्षणात कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे तसेच जालना येथील श्रीमती सविता चौधरी यांनी निवडणूक पात्रता नामनिर्देशन प्रक्रिया, निर्देशन पत्रांची छाननी तसेच चिन्हांचे वाटप आणि उमेदवारी अर्ज परत घेण्याबाबतच्या नियमांवर सादरीकरण केले.
एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना तसेच येथील निवडणुक कामकाजाशी संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            