स्वतःचे आणि हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रीय सहभाग घ्या - पालकमंत्री संजय सिरसाट

स्वतःचे आणि हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्या-पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद). दि.22 (डि-24 न्यूज)
प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर असावे हे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करत असताना शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.
तापडिया नाट्यमंदिर येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन , २०२४-२५ च्या माध्यमातून जिल्ह्यात निवडलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशाचे वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, जिल्हाचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख ,लाभार्थी ,नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील बालेवाडीतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रम आज छत्रपती संभाजी नगर येथील तापडिया नाट्य मंदिरातून शेकडो लाभार्थ्यांनी दृकश्राव्य माध्यमातून बघितला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आले.
श्री. शिरसाट म्हणाले, की या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रत्येकाला स्वत:चे घर असावे यासाठी शासन पुढाकार घेत आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. सुलभ शौचालय योजनाचां लाभ घेऊन त्याचा वापर होणे आवश्यक आहे. आवास योजनेंतर्गत आपले स्वप्नातील घर बांधण्याची ही सुरवात असून भविष्यात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत जाते त्यानुसार वाढत्या गरजेनुसार घराचीही नियोजन घर बांधताना करणे आवश्यक असल्याचेही यावेळी शिरसाट यांनी नमूद केले. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ॲपमुळे आवास योजनेची अंमलबजावणीचे सादरीकरण आणि विविध टप्पे याचे आकलन लाभार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने करून दिले आहे. या तयार केलेल्या ॲप बद्दल जिल्हा परिषदेचे विशेष कौतुकही पालकमंत्री यांनी केले
मंत्री अतुल सावे सावे म्हणाले की इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये विविध आवास योजना राबवल्या आहेत .यामधून वर्षभरात 15000 घर मंजूर करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र , गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून काम करत आहे. पहिला हप्ता आपल्याला मिळत आहे. त्यातून आपल्या घराचे काम लवकर करा, ज्यांची नावे आत्ता समाविष्ट झाली नाहीत त्यांनाही संधी मिळणार आहे. केंद्र व राज्यातील सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकुला बरोबरच शौचालय बांधकाम याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. सुविधायुक्त घर मिळण्यासाठी योजना समजावून घ्यावी, व मिळालेल्या निधीचा सुयोग्य वापर करून व त्याच्यामध्ये काही योगदान देऊन हक्काचे घर तयार करण्यासाठी लाभार्थ्यांनीही पुढाकार घ्यावा. स्थिरता , देण्याचं काम आवास योजना करत आहे असे आयुक्त गावडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे विकास मीना यांनी प्रास्ताविकात आवास योजनेची माहिती दिली. जिल्ह्यातील लाभार्थी निवड, हप्ता वितरित करण्याची पद्धती तसेच घरकुल पूर्ण करण्याबाबत पद्धती, उपाययोजना केल्या जाणार आहेत याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात ३७ हजार ५४७ जणांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला.
What's Your Reaction?






