काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको, जालना रोडवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प...!

 0
काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको, जालना रोडवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प...!

खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार; केंब्रिज चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 15(डि-24 न्यूज)- शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल आधारित बुकिंग प्रणालीमुळे होत असलेल्या गंभीर गैरसोयीविरोधात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 10 वाजता केंब्रिज चौक, जालना रोड, चिकलठाणा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून मोबाईल आधारित खत बुकिंग प्रणालीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने खासदार डॉ. कल्याण काळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर प्रणाली स्थगित करण्याची मागणी केल्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने शेतकऱ्यांच्या भावना व अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलनादरम्यान जालना रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. "खतासाठी हेलपाटे बंद करा", "शेतकऱ्यांना न्याय द्या", "वेळेत खत द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शासनाच्या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना वारंवार कृषी सेवा केंद्रांवर जावे लागत असून बुकिंग प्रक्रिया, सर्व्हर समस्या आणि वितरणातील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, "शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत खतासारख्या अत्यावश्यक कृषी निविष्ठेसाठी त्याला तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे, वारंवार फेऱ्या माराव्या लागणे आणि वेळेत खत मिळेल की नाही याची चिंता करावी लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली कोणतीही व्यवस्था शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारी ठरता कामा नये."

त्यांनी पुढे सांगितले की, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत रासायनिक खते उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने सदर मोबाईल आधारित बुकिंग प्रणालीचा तातडीने फेरविचार करून शेतकऱ्यांना होणारी गैरसोय दूर करावी. आवश्यक सुधारणा होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सुलभ व सुरळीत खत वितरण व्यवस्था सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, जगन्नाथ काळे, विश्वास औताडे, भाऊसाहेब जगताप, श्रीमंत उकिर्डे, अशोक नाबदे, अतिश पितळे, गौरव जैस्वाल, फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष मेटे, तालुकाध्यक्ष सुर्यकांत गरड, संतोष शेजुळ, कल्याण चव्हाण, जगदीश डवले, अमोल काकडे, जमील शेख, नंदकिशोर काकडे, मुसा पटेल, पंचायत समिती सदस्य विठ्ठल कोरडे, गजानन मते, दत्तु काका ठोंबरे, शिवाजी ढाकणे, ज्ञानेश्वर पठाडे, सावता गाडेकर, सुरेश शिंदे, डॉ.जब्बार खान, यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 "शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारी कोणतीही व्यवस्था स्वीकारली जाणार नाही," असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची भूमिका कायम राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त

केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow