मनपाचा आगळावेगळा वर्धापनदिन होणार साजरा
 
                                माजी महापौर, आयुक्तांकडून ठरवणार शहर विकासाचे व्हीजन...
वर्धापनदिनी मंथन : पाच दिवस मनपातर्फे विविध कार्यक्रम
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) शहराचे माजी महापौर, तसेच आजवर महापालिकेत आयुक्त पदावर काम करून सेवानिवृत झालेल्या किंवा बदलीने इतरत्र गेलेल्या अधिकार्यांंकडून शहर विकासाचे व्हीजन जाणून घेतले जाणार आहे. यातून शहर विकासाच्या विविध बाबींवर मंथन घडवून शहर विकासाचे नवीन व्हीजन ठरवण्याचा प्रशासक जी. श्रीकांत यांचा प्रयत्न आहे. यासाठी पालिकेच्या वर्धापनदिनी माजी महापौर व आयुक्तांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
पुढील महिन्यात 8 डिसेंबर रोजी पालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच प्रशासनाने वर्धापन दिनाची पूर्वतयारी सुरू केली आहे. यासंदर्भात प्रशासकांनी शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोणकोणते उपक्रम राबवावेत, यावर प्राथमिक चर्चा झाली. चर्चेअंती कार्यक्रम व उपक्रमांचे प्राथमिक स्वरूप ठरवण्यात आले.
यावेळी पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले जाणार आहे. 8 ते 15 डिसेंबरदरम्यान हे कार्यक्रम होतील. वर्धापन दिनानिमित्त शहरात महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व अभिवादन, पालिकेच्या प्रांगणात पत्रकार व अधिकार्यांची क्रिकेट स्पर्धा, महिला अधिकारी कर्मचार्यांसाठी फन गेम, संत एकनाथ रंगमंदिरात गतवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी माजी महापौर व आयुक्तांची शहर विकासाच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली जाणार आहे. विकासासाठी आवश्यक बाबींवर मंथन करून त्यातून विकासाचे एक नवीन व्हीजन ठरवावे, असा प्रशासकांचा मनोदय आले. त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
मनपा वाहनांचे शहरात पथसंचलन...
जन्मपासून ते अंत्यविधीपर्यंत, पाणीपुरठ्यापासून ते आरोग्य सेवेपर्यंत सर्वच आवश्यक आणि मुलभूत सुविधा या पालिकेकडून शहरवासीयांना पुरवल्या जातात. सध्या पालिकेकडून नागरिकांना कोणकोणत्या सुविधा व सेवा दिल्या जातात, याची नागरिकांना माहिती व्हावी, या हेतूने सर्व विभागातील वाहनांचे पथसंचलन शहरात केले जाणार आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            