सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन प्रक्रीयेची स्वतंत्र चौकशी करा - आ.अंबादास दानवे
सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करा...
शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी...
छत्रपती संभाजीनगर, दि.14(डि-24 न्यूज)- : वेरूळ (ता. खुलताबाद) येथील मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान घडलेल्या संशयास्पद बाबींची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सुरेश बोरसे यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्यात झालेल्या भेटीबाबत विविध शंका उपस्थित होत आहेत. या भेटीचा नेमका उद्देश काय होता, शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते का, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव, प्रभाव अथवा धमकी टाकण्याचा प्रयत्न झाला होता का, तसेच या भेटीचा शवविच्छेदन अहवालाच्या निष्पक्षतेवर कोणताही परिणाम झाला आहे का, याबाबत जनमानसात गंभीर संशय निर्माण झाला असल्याचे अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.
या प्रकरणातील सत्य वस्तुस्थिती समोर यावी आणि व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी वरील सर्व बाबींची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, न्यायिक अधिकारी आणि स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष चौकशी समिती तात्काळ नियुक्त करावी, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
What's Your Reaction?