अट्टल घरफोड्याच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या

अट्टल घरफोड्याच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) गारखेडा परिसरातील इंदिरानगर येथे घरफोडी करून एक मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेणार्या अट्टल घरफोड्याच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या आहे. साजेद अजीज, वय 37,राहणार इंदिरानगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या घरफोड्याचे नाव असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अशोक गिरी यांनी शनिवारी कळविली आहे.
इंदिरानगर गारखेडा परिसरातील अशोक कसारे यांच्या घरी घरफोडी करणारा साजेद अजीज हा शिवाजीनगर परिसरातील झेंडा चौकात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोरख चव्हाण, पोलिस अंमलदार चंद्रकांत पोटे, मारोती गोरे, विनोद बनकर, विजय सुरे आदींच्या पथकाने शिताफिने सापळा रचून साजेद अजीज याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने अशोक कसारे यांच्या घरातून चोरलेला मोबाईल सलमान सलीम शेख, राहणार इंदिरानगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद याला एक हजार रूपयात विकला तर चोरलेल्या 4 हजार रूपयापैकी 2 हजार 700 रूपये जुगारावर आणि दारूसाठी खर्च केले असल्याची कबूली दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या साजेद अजीज याच्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.
What's Your Reaction?






