औरंगाबाद कडकडीत बंद...रास्ता रोको, आंदोलने, कोणताही अनुचित प्रकार नाही

 0
औरंगाबाद कडकडीत बंद...रास्ता रोको, आंदोलने, कोणताही अनुचित प्रकार नाही

औरंगाबाद कडकडीत बंद...रास्ता रोको, आंदोलने, कोणताही अनुचित प्रकार नाही

मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट...पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात... मुस्लिम बांधवांनी बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली.... शहागंज, सिटीचौकातील वर्दळ थांबली....एक तरुण क्रांतीचौकात निदर्शने सुरू असताना स्वतः ला जाळून घेण्याच्या प्रयत्नात होता पोलिसांनी खबरदारी घेत त्याला ताब्यात घेतले....

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) सकल मराठा समाजाच्या आवाहनाला साथ देत शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व समाजाने आपली दुकाने बंद ठेवत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे अमाणूषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला. क्रांतीचौकात सकाळपासून हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्वांनी आपला पाठिंबा देत ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलने करत आपला सहभाग नोंदविला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, राज्य सरकारच्या विरोधात अक्रामकपणे घोषणाबाजी क्रांतीचौकात करण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्ते व महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित देशमुख यांनी बंद यशस्वी केल्यामुळे शहर व जिल्ह्यातील नागरिक व व्यापारी वर्गाचे आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी अक्रामक होत बाजारपेठ बंद आहे किंवा नाही बघण्यासाठी पैठणगेटकडे मोर्चा वळवला पण पदाधिकारी व पोलिसांनी समजूत काढली सर्व बाजारपेठ बंद आहे. असे सांगितल्यावर युवक क्रांतीचौक कडे वळले. तेथे पुन्हा अक्रामक होत आंदोलन सुरू झाले. गजानन महाराज मंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांना बडतर्फ करा, लाठीहल्ले करणा-या दोषी पोलिसांवर कारवाई करावी, मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा अशी मागणी करण्यात आली. कडकडीत बंद दरम्यान संपूर्ण मुख्य बाजारपेठ बंद होती रस्त्यावर शुकशुकाट होता. काही वाहने रस्त्यावर सुरू होती. ऑटोची वाहतूक व खाजगी वाहतूक सुरू होती. रुग्णालय, औषधांची दुकाने सुरू होती. जुना मोंढा, नवा मोंढा येथील दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. रुग्णांना अथवा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मुस्लिम बांधवांनी सुध्दा आपली दुकाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या मागणीला पाठिंबा दिला. नेहमी वर्दळ असलेल्या पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, गुलमंडी, सिटीचौक, पानदरीबा, सराफा बाजार, शहागंज, हडको टिवी सेंटर, जालना रोड, पुंडलिकनगर, न्यायनगर, सिडको बसस्थानक, सेंट्रल बसस्थानक, उस्मानपुरा, क्रांतीनगर, कोकणवाडी, रेल्वेस्टेशन, मुकुंदवाडी, चिकलठाणा, आंबेडकर नगर, क्रांतीनगर, कैनाॅट सुपर मार्केट, गणेश काॅलनी, कोटला काॅलनी, समतानगर, बायपास, नारेगाव , मिसारवाडी, चिश्तिया काॅलनी, एन-६, एन-७, एन-८ सिडको, जटवाडा रोड, हर्सुल, हिमायतबाग , उद्धवराव पाटील चौक, रोजाबाग, एकतानगर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. दुकाने बंद होती. या रस्त्यावर नेहमी ट्राफीक जाम असते दोन चार गाड्या या रस्त्यावर धावत होती. जागोजागी पोलीस बंदोबस्तात तैनात होते. शहराचे वातावरण खराब होणार नाही यासाठी शहरातील नागरिकांनी व आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त गणपत शिंदे, पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस सकाळपासून कर्तव्यावर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow