गादिया विहार सोसायटीतील साक्षी बोडखे हिची एमबीबीएससाठी शासकीय कोट्यातून निवड...!
गादिया विहार सोसायटीतील साक्षी बोडखे हिची एमबीबीएससाठी शासकीय कोट्यातून निवड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2 (डि-24 न्यूज) : महानगरपालिका प्रभागातील गादिया विहार सोसायटी येथील रहिवासी कु. साक्षी संजय बोडखे हिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शासकीय कोट्यातून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या साक्षीने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे गादिया विहार सोसायटीसह संपूर्ण प्रभागात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साक्षीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रभागाचे नगरसेवक तथा माजी महापौर त्र्यंबकजी तुपे यांच्या हस्ते तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना त्र्यंबकजी तुपे म्हणाले, “गादिया विहार सोसायटीच्या लेकीने आपल्या प्रभागाचे नाव उंचावले आहे. शासकीय कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवणे सोपे नाही. साक्षीचे हे यश प्रभागातील इतर विद्यार्थिनींसाठीही प्रेरणादायी आहे. तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
सत्काराला उत्तर देताना साक्षी बोडखे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टांना दिले. “आई-वडिलांच्या मेहनतीमुळेच मी आज या टप्प्यावर पोहोचले आहे. भविष्यात गोरगरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करणारी डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न आहे,” असे तिने सांगितले.
या कौतुक व अभिनंदन कार्यक्रमास गादिया विहार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे किशोर गोरक्षणजी लोहार, शेख नय्यर करीमजी शेख, एस. के. कुलकर्णी, शिवाजी भिवसनराव नलावडे यांच्यासह सोसायटीतील विविध मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी साक्षीचे वडील संजय विक्रम बोडखे आणि आई सौ. गंगा संजय बोडखे यांचेही अभिनंदन करण्यात आले. मुलांच्या यशामध्ये आई-वडिलांचे संस्कार, शिस्त आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे असते. आजच्या काळात प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना असेच संस्कार व शिस्त लावण्याची गरज आहे, असे मत माजी महापौर त्र्यंबकजी तुपे यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?